२६ जानेवारीला शाळांमध्ये एकाचवेळी होणार हा कार्यक्रम... मंत्र्यांचे आदेश

Share:
Main Image
Last updated: 20-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० जानेवारी - राज्यातील सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी २०२६ रोजी देशभक्तीपर गीतांवर एकाच वेळी होणार सामूहिक कवायत!

राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी देशभक्तीपर गीतांवर एकाच वेळी सामूहिक कवायत संचालनाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे.

आज शिक्षण आयुक्त, राज्यातील सर्व संचालक, सहसंचालक, उपसंचालक, डायट प्राचार्य, तसेच प्राथमिक, माध्यमिक व योजना विभागातील शिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन VC द्वारे संबोधित केले.

यावेळी स्पष्ट केले की, येणाऱ्या २६ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचालनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. यासाठी योग्य ती पूर्वतयारी पूर्ण करून घ्यावी, जागतिक पातळीवर कार्यक्रम होईल या दृष्टीने नियोजन करावे, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.

तसेच या कार्यक्रमास माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी, महिला, मुले तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित राहतील, याची विशेष काळजी घ्यावी. या कार्यक्रमाची योग्य ती प्रसिद्धी इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्रे व आकाशवाणी यांवर देण्यात यावी, असे आदेशही दिले.

याच बैठकीत १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी भयमुक्त व आनंददायी वातावरणात परीक्षेला सामोरे जावे, अभ्यास करून आत्मविश्वासाने पेपर लिहावा, तसेच शाळांनी सीसीटीव्ही व सर्व आवश्यक यंत्रणा बसवून घ्याव्यात. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.

याप्रसंगी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी हेही उपस्थित होते. प्रत्येक विभागातील उपसंचालकांनी आपापल्या जिल्ह्यात सामूहिक कवायतीसाठी केलेले सर्व नियोजन सादर केले.

२६ जानेवारी २०२६ रोजी होणारा देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात होईल, अशी ग्वाही यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

Comments

No comments yet.