ठाकरेसेनेचे नगरसेवक नॉटरिचेबल? राजकीय वर्तुळात उधाण...

Share:
Main Image
Last updated: 19-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ जानेवारी - महानगरपालिकेच्या महापौरपदावरून सत्ताधारी महायुतीमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "शिंदे आणि फडणवीस या दोघांनी एकमेकांशी काय सौदेबाजी करायची ती खुशाल करावी, मात्र स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी 'ठाकरे कार्ड' वापरण्याचे लुटूपुटुचे डाव खेळू नयेत," अशा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-भाजप सरकारवर तोफ डागली आहे.

'ठाकरे कार्ड' कशासाठी?

सध्या माध्यमांमध्ये महापौरपदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 'रस्सीखेच' रंगल्याची चर्चा आहे. या वादात वारंवार उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला जात असल्याबद्दल अंधारे यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "तुम्हाला एकमेकांवर टीका करायलाही ठाकरे हवे असतात आणि सत्तेत बसण्यासाठी एकमेकांवर दबाव निर्माण करायलाही ठाकरेच लागतात का? स्वतःच्या राजकीय तडजोडींसाठी आमच्या नावाचा वापर करणे थांबवा."

आमचे नगरसेवक 'नॉट रिचेबल' नाहीत!
ठाकरे गटाचे नगरसेवक फुटणार किंवा त्यांना ऑफर दिली जात असल्याच्या अफवांनाही अंधारे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. "ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉट रिचेबल नाहीत किंवा त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याची आम्हाला गरज नाही. त्यामुळे टेबल न्यूज पेरण्याचे बालिश प्रयत्न कोणीही करू नयेत. आमच्यासाठी लोकांचा विश्वास हा सत्तेपेक्षा लाखमोलाचा आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

'आम्ही लढत राहू'
महायुतीला इशारा देताना सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितले की, शिवसेना (UBT) आपला संघर्ष सुरूच ठेवणार आहे. "आम्ही लढतोय आणि लढत राहू! तुम्ही सोबत येणार असाल तर तुमच्यासह, नसाल तर तुमच्याशिवाय आम्ही आमचा मार्ग काढू," असा थेट संदेश त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.