नाशिक HAL साठी अभिमानास्पद क्षण... हवाई दलाला दिले हे स्वदेशी बनावटीचे विमान... प्रथमच भारतात निर्मिती...

Share:
Main Image
Last updated: 20-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० सप्टेंबर - भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्राच्या आत्मनिर्भरतेमध्ये नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) प्रकल्पाने सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे. नाशिकच्या ओझर प्रकल्पात पूर्णपणे स्वदेशी बनावटीने तयार करण्यात आलेली 'HTT-40' (एचटीटी-४०) ही मूलभूत प्रशिक्षण विमाने (Basic Trainer Aircraft) पहिल्यांदाच अधिकृतपणे भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यात सुपूर्द करण्यात आली आहेत.

बेंगळुरू येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत एचएएलने ही ऐतिहासिक हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडली. या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाला ओझर निर्मित ३ 'HTT-40' बेसिक ट्रेनर विमानांसह 'एलसीए तेजस' एफओसी श्रेणीतील २ 'ट्विन सीटर ट्रेनर्स' आणि पवन हंस लिमिटेडसाठी (PHL) ४ 'ध्रुव' नेक्स्ट जनरेशन (NG) हेलिकॉप्टर्स सोपवण्यात आली.

नाशिकच्या 'ओझर प्रकल्पा'साठी अभिमानास्पद क्षण

नाशिकमधील ओझर येथील एचएएल प्रकल्प हा आजवर मुख्यतः सुखोई-३० एमकेआय विमानांचे उत्पादन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी प्रसिद्ध होता. मात्र, भारताच्या पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या 'HTT-40' या प्राथमिक प्रशिक्षण विमानाची निर्मिती ओझर प्रकल्पात यशस्वीरीत्या पार पडल्याने नाशिकच्या औद्योगिक आणि तांत्रिक क्षमतेची मोहर पुन्हा एकदा जगभरात उमटली आहे.

भारतीय हवाई दलाच्या नवोदित वैमानिकांना (Pilot Trainees) सुरुवातीचे धडे देण्यासाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे विमान संपूर्णपणे भारतात डिझाइन आणि तयार करण्यात आले असून, नाशिकच्या तंत्रज्ञांच्या हातातून साकारलेले हे पहिलेच स्वदेशी प्रशिक्षण विमान हवाई दलाला मिळाले आहे.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज: राजनाथ सिंह

या प्रसंगी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एरोस्पेस क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, "देशाच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही आता काळाची गरज बनली आहे. नागरी आणि लष्करी हवाई वाहतूक क्षेत्रांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करू शकेल, अशी मजबूत परिसंस्था (Ecosystem) आपल्याला देशातच उभारणे आवश्यक आहे."

Advertisement

संरक्षणमंत्र्यांनी तांत्रिक प्रकल्पांमधील विलंबाबाबत चिंता व्यक्त करत वास्तववादी कालमर्यादा निश्चित करण्याचे आवाहन केले. "कोणत्याही संरक्षण प्रकल्पाला विलंब झाल्यास देशाच्या सुरक्षेचा खर्च वाढतो आणि तंत्रज्ञान कालबाह्य होण्याचा मोठा धोका निर्माण होतो," असा इशारा त्यांनी दिला. तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनी परस्परांना स्पर्धक न मानता सहयोगी म्हणून काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

नागरी विमान वाहतूक क्षेत्रात नवा अध्याय

नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी या क्षणाला भारतीय एरोस्पेस क्षेत्रातील मैलाचा दगड ठरवले. 'ध्रुव एनजी' हेलिकॉप्टर्सचे नागरी क्षेत्रात झालेले प्रमाणीकरण हे भारताच्या स्वदेशी नागरी विमान वाहतूक परिसंस्थेला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवी के. यांनी सांगितले की, "तेजस, नाशिक निर्मित एचटीटी-४० आणि ध्रुव हेलिकॉप्टर्सचे यशस्वी हस्तांतरण हे एचएएलच्या क्षमतेचे फलित आहे. वर्षानुवर्षे विकसित केलेल्या तांत्रिक क्षमतेमुळेच आपण देशाच्या संरक्षण आणि नागरी अशा दोन्ही प्रकारच्या गरजा पूर्ण करू शकत आहोत."

दिग्गजांची उपस्थिती

या ऐतिहासिक कार्यक्रमाला भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांच्यासह हवाई दल, संरक्षण मंत्रालय आणि एचएएलचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकच्या ओझर प्रकल्पात तयार झालेल्या या 'HTT-40' विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे विदेशी प्रशिक्षण विमानांवरील अवलंबित्व पूर्णपणे संपुष्टात येणार असून, 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला यातून मोठे बळ मिळाले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.