नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राला नवे बळ... 'शिक्षणाचा कुंभ', 'सुपर १००' आणि 'आनंद गुरुकुल' उपक्रमांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 19-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ सप्टेंबर - "शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील पाठांतराधारित ज्ञान न देता त्यांच्यात चांगले संस्कार, कला-क्रीडा कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवावी. शिक्षक, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांच्या संयुक्त सहभागातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा कायापालट शक्य आहे. गुणवंत शिक्षकांनी आपल्या यशाची आणि गुणवत्तेची ज्योत इतर शाळांपर्यंत पोहोचवून शैक्षणिक क्रांती घडवावी," असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

नाशिक येथे आयोजित नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित 'आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२६' प्रसंगी ते बोलत होते. मनपाच्या वतीने 'भोरे सभागृहात' तर जिल्हा परिषदेच्या वतीने 'कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात' या दोन्ही पुरस्कार वितरण सोहळ्यांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

मनपा शाळात 'शिक्षणाचा कुंभ' राबवणार; पटसंख्या ५० हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट

महानगरपालिकेच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 'शिक्षणाचा कुंभ' ही नवीन संकल्पना मांडली. मनपा शाळांमध्ये स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, सुरक्षित इमारती, डिजिटल ई-सुविधा, वाचनालय आणि कला-क्रीडा सुविधा उपलब्ध करून शाळांचा दर्जा उंचावण्याचे निर्देश त्यांनी दिले. नाशिक मनपा शाळांमधील विद्यार्थी संख्या येत्या काळात ५० हजारांच्या पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील शिक्षक भरतीवर बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, "राज्यात पारदर्शक पद्धतीने सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १३ हजार शिक्षकांची 'पवित्र पोर्टल'द्वारे विना-मुलाखत नियुक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांमधील शोधकवृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी उच्चशिक्षित शिक्षकांची भरती केली जात असून, यात कला व क्रीडा शिक्षकांनाही विशेष स्थान दिले आहे. नाशिक मनपाच्या ३१ शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर आहे."

यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक केशव गावित यांच्या समर्पित कार्याचा विशेष उल्लेख करत, अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले.

'सुपर ५०' च्या यशानंतर 'सुपर १००' चा विस्तार; 'आनंद गुरुकुल' राज्यभर राबवणार

जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री भुसे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. 'सुपर ५०' उपक्रमाच्या देदीप्यमान यशानंतर आता 'सुपर १००' उपक्रमाचा विस्तार करण्यात येत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना यातून मोफत व दर्जेदार मार्गदर्शन दिले जाईल.

तसेच कला व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभर 'आनंद गुरुकुल' ही संकल्पना राबवण्यात येणार असून, नाशिकमध्येही अशा खेळाडूंना आणि कलाकारांना विशेष प्रशिक्षकांद्वारे शिक्षण व प्रशिक्षण दिले जाईल.

विविध डिजिटल पोर्टल्सचे अनावरण व सन्मान

Advertisement

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते नाशिक मनपाच्या 'शैक्षणिक पोर्टल'चे उद्घाटन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या 'निपून मिशन नवोदय पोर्टल', 'कॉफी विथ सीईओ/ईओ', 'गुणवत्तापूर्ण शाळा डॅशबोर्ड', आणि 'जिल्हास्तरीय शाळा भेटी डॅशबोर्ड' या डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. शिष्यवृत्ती आणि एनएमएमएस (NMMS) परीक्षेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला उपमहापौर विलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित रंजन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, शिक्षणाधिकारी साईलता सालमेटी, सरोज जगताप, डॉ. मिता चौधरी, माजी नगरसेवक अजय बोरस्ते आणि निवृत्त शिक्षक संजय कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सीईओ ओमकार पवार यांनी 'सुपर १००' मधील विद्यार्थ्यांनी पुढील दोन वर्षे अभ्यासावर लक्ष केंद्रित करून मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहण्याचे आवाहन केले, तर ॲड. नितीन ठाकरे यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आयआयटी-जेईईसारख्या परीक्षांसाठी सक्षम करण्यावर भर दिला.

पुरस्कारप्राप्त आदर्श व गुणवंत शिक्षक

नाशिक महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी (१४):

रंजना मांडे (शाळा ७८ अंबडगाव), ज्योती भागवत (शाळा २१ कार्बननाका), संगीता आढाव (शाळा ४९ पंचक), संध्या जाधव (शाळा ७१ रायगडचौक), शोभा मगर (शाळा ७१ रायगडचौक), योगेश सूर्यवंशी (शाळा ७४ जाधव संकुल), नाझ परवीन खान (मुख्याध्यापक, शाळा ८४ वडाळागाव), तबस्सुम शेख (शाळा ८४ वडाळागाव), राजश्री सोनेरी (मुख्याध्यापक, शाळा १३ दिंडोरी नाका), सचिन चिखले (शाळा २७ सातपूर), दिलीप गावित (बी.डी. भालेकर शाळा), अर्चना कापडणीस (म्हसरूळ), रंजना पाटील (अभिनव बालविकास मंदिर), आणि कुंदा जयवंत बच्छाव (राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, मनपा शाळा १८ आनंदवली).

नाशिक जिल्हा परिषद तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी (१५):

१. माधुरी पवार (अजमीर सौंदाणे, बागलाण) २. सतीश अहिरे (काजीसांगवी, चांदवड) ३. सतीश आहेर (आहेरवस्ती, देवळा) ४. भिलाजी पाटील (उमराळे खुर्द, दिंडोरी) ५. अवधुत खाडगीर (भरवीर खुर्द, इगतपुरी) ६. सविता भामरे (कळवण मुली नं. १, कळवण) ७. मीना देवरे (सौंदाणे नं. १, मालेगाव) ८. गणेश साळी (गंगाधरी मोठी, नांदगाव) ९. विवेक खैरनार (महादेवपूर, नाशिक) १०. गौरी गायवन (तळेगाव वाट, निफाड) ११. योगेंद्र बोरसे (दोनवाडे, पेठ) १२. प्रकाश जगताप (धोंडबार, सिन्नर) १३. सुधाकर भोये (सुरगाणा नं. १, सुरगाणा) १४. संदीप गुंजाळ (वाघेरा, त्र्यंबकेश्वर) १५. योगेश माकोणे (दुगलगाव, येवला).

तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मनपा शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा दोन्ही कार्यक्रमांत विशेष नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सालमेटी यांनी केले, तर अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या या गौरवाबद्दल आभार मानले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.