साधुग्राम भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांची बैठक... काय झाला निर्णय?

Share:
Main Image
Last updated: 18-Sep-2026

केशव खेडकर, (नाशिक) १८ सप्टेंबर - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्राम क्षेत्रातील शेतकरी बांधव, मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण संवाद बैठक नुकतीच लक्ष्मी विजय लॉन्स येथे पार पडली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत साधूग्राम भूसंपादन, जमिनीचा मोबदला आणि स्थानिक समस्यांवर अतिशय सकारात्मक चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

सुमारे १० दिवसांपूर्वी राज्याचे कुंभमंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची पहिली बैठक पार पडली होती. त्याच चर्चेचा पुढचा भाग म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक संचालक नगरनियोजन मनपा दिव्यांक सोनवणे, नगरसेवक रिद्धीश निमसे, माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांच्यासह अनेक अधिकारी व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जमिनींवर निर्बंध नाही; भाडेतत्त्वावर होणार MOU

बैठकीत अतिरिक्त जमिनींच्या हस्तांतरणाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले की, साधूग्रामसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त जागांसाठी महानगरपालिकेसोबत भाडेतत्त्वावर सामंजस्य करार (MOU) केला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुंभमेळ्यानंतर किंवा भविष्यात शेतकऱ्यांच्या जमिनींवर महापालिकेचा किंवा शासनाचा कोणताही हक्क अथवा निर्बंध राहणार नाहीत, अशी पूर्ण शाश्वती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी व्यक्त केलेल्या भीतीचे निरसन झाले आहे.

प्रलंबित भूसंपादन व मोबदल्यासाठी विशेष निधी

Advertisement

वर्ष २००३ आणि २०१५ च्या कुंभमेळ्यादरम्यानचे प्रलंबित भूसंपादन आणि मोबदल्याचे प्रश्न अद्याप मार्गी लागलेले नाहीत, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. यावर उत्तर देताना प्रशासनाने सांगितले की, यावेळच्या अंदाजपत्रकात (बजेट) भूसंपादनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. न्यायालयीन निर्देशांचे तंतोतंत पालन करून योग्य ती पावले उचलली जात असून, थकीत मोबदल्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल.

स्थानिक रस्त्यांच्या व पार्किंगच्या मागण्यांवर तोडगा

मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकरी बांधवांच्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली होती. त्याचाच पाठपुरावा करत या बैठकीत ५०० मीटरचा रस्ता, १ किलोमीटरचे पार्किंग आणि कॅनॉल रोड ते जत्रा रस्ता यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व रस्त्यांमुळे स्थानिक वाहतूक आणि शेतकऱ्यांची सोय कशी होईल, यावर तोडगा काढण्यात आला.

प्रशासन व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीशी

यावेळी बोलताना महापौर हिमगौरी आहेर-आडके म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमंत्री गिरीशभाऊ महाजन हे या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक मार्गदर्शन करत आहेत. शासन, प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

सर्व घटकांच्या सहकार्यातून आणि समन्वयातून आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा अत्यंत लोकाभिमुख, भव्य आणि यशस्वी रीतीने पार पाडण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या संवाद बैठकीमुळे साधूग्राम परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.