नाशिक झेडपीचे 'मिशन स्कॉलरशिप’... इतक्या विद्यार्थ्यांना घडणार नासा, इस्रो, संसद भवनाची सफर...

Share:
Main Image
Last updated: 18-Sep-2026

केशव खेडकर, (नाशिक) १८ सप्टेंबर - जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान, तंत्रज्ञान आणि देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने 'ज्ञानयात्री' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता ७ वीच्या सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेच्या आधारे १०५ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून, त्यांना अमेरिका (NASA), इस्रो (ISRO) आणि दिल्लीच्या संसद भवनाची अभ्यास सहल घडवली जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

१०० गुणांची होणार विशेष निवड परीक्षा

या अभ्यास सहलीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गट आणि जिल्हा स्तरावर विशेष परीक्षा घेतली जाईल.

स्वरूप: मराठी आणि उर्दू या दोन्ही माध्यमांतून १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षेसाठी १२० मिनिटांचा वेळ दिला जाईल.

निवड प्रक्रिया: जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून प्रत्येक तालुक्यातून गुणवत्ता यादीतील अव्वल ७ विद्यार्थ्यांची (१५ x ७ = १०५) अंतिम निवड केली जाईल.

१०५ 'ज्ञानयात्री' विद्यार्थ्यांना तीन विशेष अनुभव विश्वांची सफर:

१५ विद्यार्थी – नासा (NASA, अमेरिका):

Advertisement

अमेरिकेतील जगप्रसिद्ध 'नासा' या अवकाश संशोधन संस्थेला भेट देऊन विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेण्याची ऐतिहासिक संधी मिळेल.

४५ विद्यार्थी – इस्रो (ISRO, भारत):

भारताच्या अवकाश संशोधनाचे केंद्र असलेल्या 'इस्रो'ला भेट देऊन उपग्रह तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीची माहिती प्रत्यक्ष अनुभवता येईल.

४५ विद्यार्थी – नवी दिल्ली व संसद भवन:

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे संसद भवनासह महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांना भेट देऊन भारतीय लोकशाही व्यवस्था आणि संसदीय कार्यपद्धती विद्यार्थ्यांना जवळून समजून घेता येईल.

'स्थानिक प्रतिभेला आंतरराष्ट्रीय संधींची जोड'

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. "जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अफाट प्रतिभा आहे. त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव उज्ज्वल करू शकतात," असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.