नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - देशाच्या अर्थव्यवस्थेची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच उद्योग, व्यापार, शेती, बाजारपेठ आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन गतिमान ठेवण्यात वाहनचालक बांधवांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ऊन, वारा, पाऊस, दिवस-रात्र यांची तमा न बाळगता हजारो किलोमीटरचा प्रवास करून देशाची जीवनवाहिनी अखंड सुरू ठेवणाऱ्या या कष्टकरी चालक बांधवांच्या कार्याचा गौरव म्हणजे देशाच्या गतिमान अर्थव्यवस्थेचा सन्मान आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केले.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल, आडगाव नाशिक येथे ‘चालक दिन–२०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात चालकांच्या सन्मानासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी, सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष पी.एम. सैनी, चेअरमन राजेंद्र नाना फड, महासचिव बजरंग शर्मा, फंड कमिटीचे चेअरमन सुभाष जांगडा यांनी विशेष पुढाकार घेतला.
यावेळी परिवहन अधिकारी श्रीनिवास जल्लावार,आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण,महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष संजय सोनवणे, गोल्डन डेज स्कूलचे संचालक हरबीर चौधरी, प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे, नगरसेवक नामदेव शिंदे, नगरसेवक सुरेश खेताडे, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, अजय खरा, कोपरगाव संघटनेचे अध्यक्ष आयुब कच्छी यांच्यासह वाहतूक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रकाश गवळी पुढे म्हणाले की, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सातत्याने पाठपुरवा करून नाशिकमध्ये अद्ययावत ट्रक टर्मिनल उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सर्व वाहतूकदारांना सहभागी करून घेण्यात यावे. याठिकाणी चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना ट्रक टर्मिनलमध्ये सुरक्षित व सन्मानजनक वातावरण मिळावे,यामुळे चालकांचा सन्मान वाढण्यासोबतच त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घेता येईल, चालक आणि वाहतूकदारांच्या हिताच्या दृष्टीने नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन करत असलेले कार्य अतिशय महत्वाचे आहे,असे त्यांनी सांगितले.
देशातील मालवाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात चालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असतानाही त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक सुविधांकडे पुरेसे लक्ष जाणे आवश्यक आहे. ‘चालकांचा सन्मान – सुरक्षित वाहतुकीचा संकल्प’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या चालक दिनाच्या माध्यमातून चालक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी समाजाने आणि संबंधित यंत्रणांनी अधिक संवेदनशीलतेने पुढे यावे, असे आवाहन प्रकाश गवळी यांनी यावेळी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नाशिकचे मनपाचे अतिरिक्त उपायुक्त आधीरंजन चौधरी यांनी चालक बांधवांचे योगदान अधोरेखित करताना सांगितले की, चालकांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे सल्लागार सुनील बुरड, जे. पी. जाधव, जयपाल शर्मा, महावीर मित्तल, रामभाऊ सूर्यवंशी, संजय तोडी, हरिसिंग तिवारी यांच्यासह कार्यक्रमाचे चेअरमन सियाराम शर्मा, व्हाइस चेअरमन महेंद्रसिंग राजपूत, तसेच उपाध्यक्ष शंकरराव धनावडे, सदाशिव पवार, सतीश कलंत्री, भगवान कटीरा, सुनील ढाने, हसरत शेख, शक्तिसिंग राजपुरोहित, नरेश बन्सल, मनोज उदावंत, किशन बेनिवाल, सजनसिंग राजपुरोहित, जस्वंदरसिंग रांधवा, रंधवीरसिंग, संभाजी जाधवर, संदीप बिर्ला, गुणपाल, अशोक पवार, अशोक वाघ, राजेश शर्मा, दीपक पांडे, माणिक मेमाणे, महावीर शर्मा आणि सुरेश शर्मा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूकदार, वाहनमालक आणि चालक यांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच चालक कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. चालकांची आरोग्य तपासणी, अपघाती विमा, प्रशिक्षण, सुरक्षितता आणि आवश्यक मूलभूत सुविधा या विषयांना संघटनेने सातत्याने प्राधान्य दिले असल्याचे संघटनेचे माजी अध्यक्ष जयपाल शर्मा यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
चालक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात चालक बांधवांच्या आरोग्याचा विचार करून कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी, १०३ चालकांची नेत्र तपासणी ९० चालकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी २२५ चालक बांधवांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या किमतीचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले. तसेच २०० चालक बांधवांना सोलापुरी चादरींचे वाटप करण्यात आले. चालक बांधवांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.