"खड्ड्यांमुळे त्रस्त, पुढच्या वर्षी येऊ की नको?" नाशिक पालिकेचे डोळे उघडण्यासाठी बाप्पाचा जळजळीत देखावा...

Share:
Main Image
Last updated: 17-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर - शहरभरातील रस्त्यांची झालेली चाळण, खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी आणि रोजची वाहतूक कोंडी या गंभीर समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी पंचवटीतील हिरावाडी रोड येथील 'त्रिमूर्ती नगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ' आणि 'मदत फाऊंडेशन'तर्फे यंदा अनोखा समाजप्रबोधनात्मक देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा तयार करण्यात आला असून, या माध्यमातून थेट गणपती बाप्पाच प्रशासनाला जाब विचारताना दिसत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सरकारविरोधात जनजागृती आणि समाजप्रबोधन करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी केली होती. तोच वारसा पुढे चालवत त्रिमूर्ती नगर मित्र मंडळाने नाशिककरांच्या ज्वलंत प्रश्नांना या देखाव्यातून वाचा फोडली आहे.

देखाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

Advertisement

प्रशासनाला जाब: रस्त्यांवरील खड्डे, त्यांमुळे होणारे भीषण अपघात, वृक्षतोडीमुळे वाढणारे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यांवर देखाव्यातून थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

कुंभमेळ्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण होणार की नाही, असा सवाल नाशिककरांच्या वतीने बाप्पा प्रशासनाला विचारत आहे.

भावनिक साद: नाशिकमधील खड्ड्यांच्या दुरावस्थेला कंटाळून "पुढच्या वर्षी येऊ की नको?" असा अत्यंत मनाला भिडणारा आणि मार्मिक प्रश्न गणपती बाप्पा या देखाव्यातून विचारताना दिसत आहे.

नाशिक महापालिकेचे आणि लोकप्रतिनिधींचे डोळे उघडण्यासाठी हा देखावा साकारण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. सध्या हिरावाडी परिसरातील हा देखावा नाशिककरांचे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, या सामाजिक उपक्रमाचे शहरात मोठे कौतुक होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.