नाशिक, (प्रतिनिधी) १६ सप्टेंबर - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे शहराची झालेली दुरवस्था आणि नागरिकांचे होणारे हाल यावरून सजग नागरिक आणि आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रतन लथ यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "नाशिककरांच्या संयमाचा अंत पाहू नका; जर नागरिकांचा उद्रेक झाला तर प्रशासनाला पळता भुई थोडी होईल," असा इशारा देत त्यांनी रस्त्यांची कामे पूर्ण होण्याच्या लेखी तारखा जाहीर करण्याचे थेट आव्हान महापौर आणि आयुक्तांना पत्राद्वारे दिले आहे.
विकासकामांच्या नावाखाली शहर वेठीस
रतन लथ यांनी पत्रात नमूद केले आहे की, १९८० पासून आतापर्यंत त्यांनी चार सिंहस्थ कुंभमेळे पाहिले; मात्र रस्त्यांची इतकी बिकट अवस्था कधीही पाहिली नव्हती. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी गॅस, पाणी, सांडपाणी व फायबर लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने कामात दिरंगाई होत असल्याचे समजू शकते; परंतु एकाच वेळी शहरातील सर्व रस्ते खोदून संपूर्ण नाशिककरांना वेठीस धरण्यात आले आहे. कुंभमेळा तोंडावर आला असताना 'रात्र थोडी, सोंग फार' अशी परिस्थिती निर्माण झाली असून कामांचा दर्जाही सुमार दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खड्ड्यांमुळे नागरिकांचा जातोय जीव
सिमेंट रस्त्यांची उंची वाढल्याने आजूबाजूच्या इमारतींमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. खोदकामामुळे पसरलेला चिखल आणि खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे काहींना जीव गमवावा लागला असून "आधी रस्त्यात खड्डे असायचे, आता खड्ड्यांचाच रस्ता झाला आहे का?" असा संतप्त सवाल लथ यांनी केला आहे.
उडवाउडवीची उत्तरे नको, कामांची निश्चित तारीख द्या
प्रशासनाच्या नियोजन आणि अंमलबजावणीतील दरी उघडी पडली असून, अधिकारी नागरिकांना काही समजत नाही अशा थाटात वागत असल्याची टीका त्यांनी केली. उसने घेतलेले पैसे परत न करण्यासाठी जशी खोटी कारणे दिली जातात, तशी कारणे रस्त्यांच्या विलंबासाठी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "आम्हाला उडवाउडवीची उत्तरे नको आहेत; त्र्यंबक रोड, गंगापूर रोड यांसारखे रस्ते नेमके कधी पूर्ण होणार याच्या ठाम आणि लेखी तारखा जाहीर करा," अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
सदर पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्तांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.