नाशिक, (प्रतिनिधी) १६ सप्टेंबर - राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला सहा महिने पूर्ण होत असतानाच, महाराष्ट्रातील अंधश्रद्धेचे आणि बुवाबाजीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) पाठपुराव्यामुळे गेल्या अवघ्या सहा महिन्यांत राज्यात १०० हून अधिक भोंदू बाबांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक लूट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक लुटीचे प्रमाण चिंताजनक
अंगात आलेले भूत काढणे, करणी-भानामती दूर करणे, अघोरी पूजा, पैशांचा पाऊस पाडणे तसेच कौटुंबिक व आरोग्यविषयक समस्या सोडवण्याच्या नावाखाली या भोंदूंनी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. अनेक प्रकरणांमध्ये पीडित महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. समाजात बदनामीच्या आणि भोंदूंच्या भीतीपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत होते; मात्र खरात प्रकरणानंतर पीडितांना धीर मिळून त्यांनी तक्रारी दाखल केल्या.
सर्वधर्मीय भोंदूंचा समावेश; अंनिसवरील आरोपांना चोख उत्तर
नोंदवलेल्या १०० गुन्ह्यांमध्ये हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा सर्वच धर्मांतील भोंदू बाबा, मांत्रिक, मौलाना आणि पाद्री यांचा समावेश आहे. त्यामुळे "अंनिस केवळ एकाच धर्माविरोधात काम करते" या सनातनी आरोपांमधील हवा निघून गेली असून, भोंदूगिरीला कोणताही धर्म नसतो हेच यावरून स्पष्ट झाले आहे.
जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तातडीने बनवा: अंनिसची मागणी
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १८ वर्षांच्या संघर्षानंतर २०१३ मध्ये 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा' अस्तित्वात आला. मात्र, अद्याप या कायद्याचे नियम (Rules) राज्य सरकारने तयार न केल्याने पोलिसांना गुन्हा नोंदवताना कायदेशीर अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने नियम तयार करावेत आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात 'दक्षता अधिकारी' (Vigilance Officer) नेमावा, अशी मागणी महा. अंनिसचे संजय बनसोडे, कृष्णा चांदगुडे, ॲड. रंजना गवांदे व विष्णुदास लोणारे यांनी केली आहे.
जिल्हानिहाय प्रमुख आकडेवारी (१०० गुन्हे):
पुणे व नाशिक: सर्वाधिक गुन्हे (पुणे - २१, नाशिक - १५)
अहिल्यानगर (अहमदनगर): ८ गुन्हे
विदर्भ (नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा): २८ हून अधिक गुन्हे
मुंबई, ठाणे व उपनगरे: १० गुन्हे
मराठवाडा व इतर भाग: उर्वरित गुन्हे नोंदवले गेले आहेत.