नाशिक, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - महाराष्ट्र शासनाने यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करत महाराष्ट्राच्या समृद्ध गणेश परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला पाठबळ देत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या ‘साल्हेरगड’ या शासकीय निवासस्थानी पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्तीची अत्यंत भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी मिश्रा यांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली.
रायगडच्या मूर्तिकाराची कलाकृती; 'सिद्धिविनायक' रूपाची प्रेरणा
निवासस्थानी बसवण्यात आलेली ही वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती पेण (जि. रायगड) येथील प्रसिद्ध मूर्तिकार महेश पाटील यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता पूर्णतः शाडूमातीपासून साकारली आहे. महाराष्ट्रातील प्राचीन काळ्या पाषाणमूर्तींच्या शैलीतून या मूर्तीची प्रेरणा घेण्यात आली आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील अव्यक्त ब्रह्मतत्त्वाचे प्रतीक म्हणून मूर्तीला गडद वर्ण देण्यात आला आहे.
तसेच, योगपरंपरेनुसार तेज, संकल्पशक्ती आणि कर्मयोगाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या उजव्या सोंडेच्या 'सिद्धिविनायक' रूपात ही मूर्ती साकारण्यात आली आहे.
पिंपळवृक्षाखाली पूर्वाभिमुख प्रतिष्ठापना
ज्ञान, विवेक आणि नवचैतन्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पूर्व दिशेला तोंड करून, पवित्र पिंपळवृक्षाखाली या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे उगवत्या सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात.
सजावटीतही पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला असून दुर्वा, लाल जास्वंद आणि सात्त्विकतेचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाला जागतिक डिजिटल व्यासपीठ
शासनाच्या 'राज्य महोत्सव' उपक्रमांतर्गत पुरातत्त्व संचालनालयामार्फत विशेष पोर्टल व व्हॉट्सअॅप सुविधा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे देश-विदेशातील नागरिकांना आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, सजावट आणि परंपरांची नोंद ऑनलाइन करता येणार आहे. जगातील ३५ हून अधिक शहरांतील नागरिक या उपक्रमाशी जोडले जाण्याची शक्यता आहे.
'साल्हेरगड' येथील ही प्रतिष्ठापना पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक परंपरा आणि आध्यात्मिक चिंतेचा एक सुंदर संगम ठरली असून, यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक सकारात्मक संदेश समाजात गेला आहे.