नाशिक, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - शहरात सुरू असलेली कुंभमेळा विकासकामे, ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे पसरलेला चिखल यामुळे नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था अत्यंत भीषण झाली आहे. यातच नाशिक शहरात अपघातांचे सत्र सुरू असून, गेल्या २४ ते ४८ तासांत तीन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
१. मुंबईनाका परिसरातील नंदिनी नदीजवळ असलेल्या डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर सोमवारी (दि. १४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या अज्ञात आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरून प्रवास करणारा तरुण जागीच गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. किरण चांगदेव नरोडे (३३, रा. साईदर्शन अपार्टमेंट, गणेशनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण नरोडे हे आपल्या पल्सर दुचाकीने (क्रमांक एमएच १५ जीडी १३९७) मुंबई-आग्रा महामार्गाच्या सर्व्हिस रोडने मुंबईकडून धुळ्याच्या दिशेने जात होते. डेटा मॅट्रिक्स इमारतीसमोर आले असता, भरधाव आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत किरण यांच्या डोक्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली, तर उजव्या हातालाही जबर मार लागला.
अपघातानंतर टेम्पो चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच किरण यांचे बंधू सुरेश नरोडे यांनी प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने गंभीर जखमी किरण यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे यांनी किरण यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आयशरचा आणि त्याच्या फरार चालकाचा शोध पोलीस अंमलदार टेमगर करत आहेत.
२. दिंडोरी रोडवर वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
रविवारी (दि. १३ सप्टेंबर) दिंडोरी रोडवरील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत दोन दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला:
पहिली घटना (तारवाला सिग्नल): मखमलाबाद येथील रहिवासी कैलास शंकर रोकडे (वय ४२) हे दुचाकीने जात असताना तारवाला सिग्नल भागातील महावीर हॉटेलसमोर दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार जाधव तपास करत आहेत.
दुसरी घटना (बजाज शोरूमसमोर): सिडकोतील पवननगर येथील रहिवासी संतोष शिवाजी गांगुर्डे (वय ३०) हे रविवारी सायंकाळी दुचाकीने दिंडोरी रोडने जात असताना बजाज शोरूमसमोर एका एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष गांगुर्डे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार जगताप या घटनेचा तपास करत आहेत.
दररोज जातातय तरुण मुलांचे बळी; नाशिक मनपा पूर्णपणे 'ढिम्म'
कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत, परंतु कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून पावसाचा आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार गंभीर अपघातांना बळी पडत आहेत. नागरिक रोज जीव मुठीत धरून प्रवास करत असताना, नाशिक महानगरपालिका प्रशासन मात्र पूर्णपणे 'ढिम्म' आणि अकार्यक्षम असल्याचे चित्र आहे.
नाशिककरांचा संतप्त सवाल: "अजुन किती बळी घेणार?"
रस्त्यांची दुरवस्था आणि अपघातांचे वाढते प्रमाण पाहून नाशिककरांचा संयम सुटला आहे. "कुंभमेळा विकासकामांच्या नावाखाली शहराच्या रस्त्यांची चाळण करून ठेवली आहे, अजून किती निष्पाप नाशिककरांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
घटनास्थळी आणि सोशल मीडियावर नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला असून, दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याची आणि शहरातील जीवघेणे खड्डे त्वरित बुजवण्याची जोरदार मागणी केली आहे.