खान्देशी संमेलनासाठी राज्य सरकार देणार इतके लाख... धुळ्यात येथे साकारणार 'कवितांचं गाव'...

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

धुळे, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - मराठी भाषा ही आपली मातृभाषा असली तरी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या प्रत्येक बोलीभाषेतील शब्द, साहित्य आणि संस्कृती जपली पाहिजे. बोलीभाषा केवळ टिकवून ठेवायच्या नसून त्या जगल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल आणि निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

धुळे येथे आयोजित मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत साहित्यिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि घोषणा:

दरवर्षी १५ लाखांच्या निधीसह 'खान्देशी संमेलन':

विदर्भातील झाडीबोली संमेलनाच्या धर्तीवर खान्देशातील अहिराणी आणि इतर बोलीभाषांसाठी दरवर्षी दोन दिवसीय 'खान्देशी संमेलन' आयोजित केले जाईल. यासाठी मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी १५ लाख रुपयांचा निधी दिला जाईल.

१०० बोलीभाषांच्या शब्दकोशात अहिराणीला प्राधान्य:

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील १०० बोलीभाषांचे शब्दकोश (Dictionary) तयार केले जाणार आहेत. यात पहिल्या पाच प्राधान्यक्रमांमध्ये 'अहिराणी शब्दकोशा'चा समावेश असेल.

धुळ्यात प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या नावाने 'कवितांचं गाव':

ज्येष्ठ कवी प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या कार्याचा गौरव म्हणून धुळे शहरात 'कवितांचं गाव' उभारले जाईल. यासाठी मराठी भाषा विभागाकडून १० हजार पुस्तके उपलब्ध करून दिली जातील.

प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात 'मराठी भाषा विभाग':

Advertisement

साहित्यिकांना लहान-सहान कामांसाठी मंत्रालयात यावे लागू नये, म्हणून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्यासह स्वतंत्र 'मराठी भाषा विभाग' सुरू केला जाईल. येत्या महिन्याभरात हा निर्णय लागू होणार आहे.

साहित्यिकांसाठी स्वतंत्र मानधन योजना व 'साहित्य सहल':

वृद्ध आणि गरजू साहित्यिकांसाठी 'कलाकार मानधन योजने'च्या धर्तीवर स्वतंत्र मानधन योजना सुरू करण्याचा सकारात्मक विचार सरकार करत आहे. तसेच पुण्यातील १०० व्या साहित्य संमेलनासाठी प्रत्येक जिल्ह्यातून साहित्यिकांना नेण्यासाठी 'साहित्य सहल' आयोजित केली जाईल.

मुंबईत 'मराठी भाषा भवन' आणि ऐरोलीत 'साहित्यिक अतिथिगृह':

नरिमन पॉईंट (मुंबई) येथे १०० कोटी रुपये खर्चून 'मराठी भाषा भवन' तर ऐरोली येथे ३५ कोटी रुपये खर्चून साहित्यिकांसाठी सर्वसोयींयुक्त अतिथिगृह उभारले जात आहे.

अहिराणी साहित्याला हक्काचे स्थान देणार – पालकमंत्री जयकुमार रावल

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, अहिराणी हा खान्देशचा आत्मा आणि पूर्वजांचा वारसा आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय ग्रंथालयात अहिराणी पुस्तकांसाठी स्वतंत्र कपाटांची व्यवस्था केली जाईल.

दुर्मीळ पुस्तके आणि ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी 'राजवाडे संशोधन केंद्रा'ला आवश्यक जागा व निधी दिला जाईल.

धुळ्यात साहित्यिकांसाठी कायमस्वरूपी 'अहिराणी हॉल' उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनामार्फत पुढे नेला जाईल.

Advertisement

Comments

No comments yet.