दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १२ सप्टेंबर - प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या (PMMVY) प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा राज्यस्तरावर विशेष सन्मान करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात आयोजित '९ व्या राष्ट्रीय पोषण माह'च्या राज्यस्तरीय शुभारंभ सोहळ्यात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या प्रसंगी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख, विस्तार अधिकारी विजय पचलोरे आणि जिल्हा समन्वयक अश्विनी केदार मंचावर उपस्थित होते.
५,७०५ अंगणवाड्यांच्या प्रभावी समन्वयातून यश
गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्य व पोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या योजनेत नाशिक जिल्ह्याने अंगणवाडी स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन (Micro-planning) केले होते.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले. तालुकानिहाय व बीटनिहाय नियमित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा सातत्याने आढावा घेण्यात आला. बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यातील उत्तम समन्वयामुळेच जिल्ह्यातील ५,७०५ अंगणवाड्यांच्या माध्यमातून हा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचू शकला, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली.
काय आहे 'प्रधानमंत्री मातृवंदना योजना'?
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आरोग्य आणि पोषणासाठी थेट आर्थिक मदत दिली जाते:
पहिल्या अपत्यासाठी: रु. ५,०००/- आर्थिक सहाय्य.
दुसऱ्या खेपेस मुलगी झाल्यास: रु. ६,०००/- आर्थिक सहाय्य.
प्रशासनाकडून अभिनंदन
नाशिक जिल्ह्याला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणजे संपूर्ण जिल्हा प्रशासन, महिला व बाल विकास विभाग आणि अंगणवाडी स्तरावरील संपूर्ण टीमच्या एकत्रित परिश्रमाची पावती आहे, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी संपूर्ण यंत्रणेचे अभिनंदन केले.