शेतकरी कर्जमाफी... नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची दुसरी यादी जाहीर... असे बघा नाव...

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

केशव खेडकर, (नाशिक) १२ सप्टेंबर - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी या योजनेचा दुसरा टप्पा (दुसरी यादी) जाहीर झाला असून, दोन्ही जिल्ह्यांतील हजारो थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी तात्काळ आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करण्याचे आवाहन संबंधित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा: ३,८०८ नवीन पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी

नाशिक जिल्ह्यात कमाल २ लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमुक्ती देण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे.

दुसऱ्या यादीतील आकडेवारी: दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (NDCC) १,३४३ आणि राष्ट्रीयकृत बँकांचे २,४६३ असे एकूण ३,८०८ नवीन पात्र शेतकरी खात्यांची यादी प्राप्त झाली आहे.

पहिल्या टप्प्याची स्थिती: पहिल्या टप्प्यात ३५,८९० पात्र शेतकऱ्यांपैकी ३२,३७५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून उर्वरित ३,२६७ शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे.

एकूण अपलोड माहिती: नाशिकमधून एकूण ६८,८५९ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती.

'हेअर कट' धोरण: ३१ मार्च २०२६ पर्यंतची कर्जथकबाकी ग्राह्य धरली जाईल. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ केले जातील. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांशी संबंधित ज्या शेतकऱ्यांचे ३१ मार्च २०२६ पर्यंतचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांचे कर्ज शासनाच्या 'हेअर कट' (Hair Cut) धोरणानुसार निरंक केले जाणार आहे.

पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, सेवा संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे, त्यांनी जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन ते मोफत पूर्ण करावे. काही तक्रार असल्यास बँकेशी किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले आहे.

Advertisement

जळगाव जिल्हा: दुसऱ्या यादीत ७,३१६ शेतकऱ्यांचा समावेश

जळगाव जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे.

दुसऱ्या यादीतील आकडेवारी: ११ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५,३९९ आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांचे १,९१७ असे एकूण ७,३१६ शेतकरी पात्र ठरले आहेत.

आगामी काळात इतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

याद्या बँक शाखा व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केल्या जात आहेत. यादीतील सर्व शेतकऱ्यांनी विलंब न करता आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे

प्रक्रिया स्थान: नजीकचे आपले सरकार सेवा केंद्र / ई-सेवा केंद्र (विनामूल्य ई-केवायसी).

लाभ मिळण्याची पद्धत: आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होताच कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.