नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस हवालदार रामचंद्र राजाराम आडके (वर्ग-३) यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आडके याला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये ४ वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
काय होते नेमके प्रकरण?
नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात मूळ तक्रारदार आणि त्यांच्या चुलत भावाला अटक करून, त्यांची पोलीस कोठडी न मागता थेट न्यायालयात हजर करण्यासाठी हवालदार रामचंद्र आडके याने २३ सप्टेंबर २०१४ रोजी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ सप्टेंबर २०१४ रोजी गिरणारे आउट पोस्ट येथे सापळा रचून आडके यास पंचांसमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकाल आणि शिक्षा
तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. नाशिक कोर्ट क्र. ४ चे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एन. एल. मोरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी आडके यास दोषी ठरवत पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
कलम ७ अन्वये: ३ वर्षे कारावास व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास).
कलम १३ (२) अन्वये: ४ वर्षे कारावास व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास).
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गीरवाडकर यांनी बाजू मांडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास लोंढे, कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रदिप काळोगे, प्रभाकर गवळी व किरण धुळे यांनी खटल्याचे यशस्वी कामकाज पाहिले.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास निर्भिडपणे टोल-फ्री क्र. १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्र. ९५४५६५१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन 'लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक'तर्फे करण्यात आले आहे.