येवला, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे ₹७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प केवळ एक उद्योग नाही. हा आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची दररोज सुमारे १२०० मेट्रिक टन मका प्रक्रिया करण्याची क्षमता प्रस्तावित आहे. मक्यापासून स्टार्च तसेच स्टार्चवर आधारित विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे ३.५० लाख मेट्रिक टन मक्याची मागणी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे येवला आणि नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी, विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला कृषि उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन व पार्किंग शेडची उभारणी करणे व इतर विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.
यावेळी खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारोतीराव पवार, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला नगरध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, उपसभापती रतन बोरनारे, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, विश्वासराव आहेर, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी सभापती किसनराव धनगे, संजय बनकर, पप्पू सस्कर, नगरसेवक प्रवीण बनकर, गणेश शिंदे, गोटू मांजरे, प्रशांत शिंदे, दिपक लोणारी, संचालक प्रतिभाताई शिंदे, संध्या पगारे, संजय पगार, अल्केश कासलीवाल, बापूसाहेब गायकवाड, नंदकिशोर अट्टल, कांतिलाल साळवे, भरत समदडिया, अर्जुन ढमाले, माजी नगरध्यक्ष बंडू क्षीरसागर, तानाजी आंधळे, अर्जुन कोकाटे, बाळासाहेब गुंड, मोहन शेलार, सचिन कळमकर, मच्छिंद्र थोरात, दीपक पाटोदकर, माधवराव पाटील, मकरंद सोनवणे, नितीन गायकवाड, भास्कर कोंढरे, महेश काळे, अशोक संकलेचा, नाना लहरे, राजेंद्र भांडगे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, उमेश अट्टल, नवनाथ काळे, राजेंद्र परदेशी, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, तालुका कृषि अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे, संचालक मंडळ, सचिन यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, विनोबा भावे यांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, भूमिहीनांना जमीन मिळावी आणि गावागावात सामाजिक समता व सहकार्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. भूदान चळवळीच्या माध्यमातून जमीनदारांनी स्वेच्छेने जमीन भूमिहीनांना द्यावी, असा विचार देशभर पोहोचवला. हजारो किलोमीटर पायी प्रवास करून त्यांनी शेतकरी, भूमिहीन आणि ग्रामीण समाजाशी संवाद साधला.
विनोबा भावे यांचा विचार केवळ जमीन वाटपापुरता मर्यादित नव्हता. तर जमीन, श्रम, उत्पादन आणि समाज यांचा संबंध माणुसकीच्या आणि सहकार्याच्या भावनेतून असावा, हा त्यांच्या विचाराचा गाभा होता. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाला अत्यंत महत्त्व दिले. त्यांनी ‘गाव घडले तर देश घडेल’ या भावनेतून ग्रामीण समाजाला जागृत करण्याचे काम केले. श्रमाची प्रतिष्ठा, स्वावलंबन, स्वच्छता, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि ग्रामविकास यांचा संदेश त्यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येवला बाजार समितीत कृषि भवन मंजूर करण्यात आले आहे. यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. आज शेतकरी भवनाचे काम आपण करतो आहे. त्याचप्रमाणे येथे माथाडी भवन निर्माण करण्यासाठी बाजार समितीने प्रस्ताव तातडीने पाठवावा असे त्यांनी सांगितले. आज आपण त्यांच्या नावाने शेतकरी भवन उभारत आहोत. त्यामुळे या वास्तूच्या माध्यमातून शेतकरी हिताचा आणि ग्रामविकासाचा विचार प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आज शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजारभाव, साठवणूक, प्रक्रिया आणि बाजारपेठ या सर्व प्रश्नांकडे आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्याला केवळ उत्पादन करणारा नव्हे, तर आपल्या उत्पादनाला मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न मिळवणारा उद्योजक बनवायचे आहे. आपला शेतकरी कष्ट करून मका, कांदा, सोयाबीन, भाजीपाला, धान्य आणि विविध पिकांचे उत्पादन घेतो. मात्र उत्पादन झाल्यानंतर त्याला सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे माल विकायचा कुठे आणि किती भाव मिळणार? म्हणूनच केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नाही. उत्पादनाला बाजारपेठ, बाजारपेठेला प्रक्रिया उद्योग आणि प्रक्रियेला देश-विदेशातील बाजारपेठ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आज जगभरात अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी संधी आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील शेतीला जर आधुनिक अन्नप्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली, तर शेतकऱ्याच्या उत्पादनाचे मूल्य वाढेल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार प्रत्यक्ष आणि ३ हजारांपर्यंत अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. जवळपास ४ हजार कुटुंबांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या संधी निर्माण होऊ शकतात. याचा फायदा केवळ कारखान्यात काम करणाऱ्या युवकांना होणार नाही, तर वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, दुरुस्ती-देखभाल, कृषी माल पुरवठा, सेवा क्षेत्र आणि इतर पूरक व्यवसायांनाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येवला शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येसगाव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मनमाड येवला कोपरगाव रस्त्याचे चौपदरी काँक्रीटीकरण, येवला पिंपळस रस्त्याचे चौपदरी काँक्रीटीकरण, येवला बायपास रस्ता, लासलगाव पाटोदा नगरसुल रस्ता काँक्रीटीकरण, येवला अडतीस गाव योजनेसाठी वाढीव सौर ऊर्जा प्रकल्प यासारखी अनेक कामे मंजूर करण्यात आली आहे. तसेच अनेक कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बाजार समितीनेही बदलत्या काळासोबत पुढे जावे. आजच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन आधुनिक बाजारव्यवस्थेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, साठवणूक, पॅकिंग, ग्रेडिंग, वजनकाटा, पारदर्शक व्यवहार, डिजिटल सुविधा आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळाली पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य मोबदला मिळणे हा विकासाचा खरा मापदंड आहे. त्यामुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीनेही पुढील काळात शेतकरी केंद्रित, आधुनिक आणि पारदर्शक बाजारव्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, बाजार समितीचे सभापती वसंत पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.