नाशिक, (प्रतिनिधी) ११ सप्टेंबर - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे आणि मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी. कायदा-सुव्यवस्थेचे पालन करत उत्सव अत्यंत आनंदात, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असे आवाहन नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांनी केले आहे.
नाशिक ग्रामीण क्षेत्रात १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार असून, यंदा एकूण २,५८१ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान टप्प्याटप्प्याने श्रींचे विसर्जन पार पडणार आहे.
मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या:
दर्शनासाठी येताना सोबत कमीत कमी साहित्य आणावे. पैसे, दागिने व इतर मौल्यवान वस्तूंची स्वतः योग्य ती दक्षता घ्यावी.
गर्दीत मोबाईल फोन टाळावा:
गणेश मंडळे किंवा मंदिरांमधील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी सोबत मोबाईल फोन आणणे शक्यतो टाळावे.
संशयास्पद वस्तूंबाबत सतर्कता: कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद वस्तू/पिशवी आढळल्यास तिला स्पर्श न करता तातडीने ऑन-ड्यूटी पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी.
नियंत्रित पार्किंग:
आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त न लावता प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत.
अफवांना बळी पडू नका: सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती अधिकृत यंत्रणेकडून खात्री करूनच स्वीकारावी.
“गणेशोत्सव हा सर्वांच्या आनंदाचा सण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. भाविकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे.”
— विमला एम., अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण