येवला, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - येवला तालुक्यातील ५५ गावांसह १३ संस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वीजखर्चाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून अधिकचा ३०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मंजुरी देत प्रशासकीय मान्यता दिली आहे.
येवला तालुक्यातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सुरुवातीला ३८ गावांची तहान भागविण्यासाठी सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून सध्या तालुक्यातील ५५ गावे तसेच १३ विविध संस्थांना यशस्वीरित्या पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या योजनेच्या कार्यान्वयनासाठी दर महिन्याला मोठ्या प्रमाणात वीज आवश्यक असल्याने वीजखर्च हा महत्त्वाचा आर्थिक भार ठरत होता. हा खर्च कमी करून पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी सौर ऊर्जेचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे.
या योजनेसाठी यापूर्वीच २६८ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे. आता नव्याने ३०० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने दोन्ही प्रकल्पांची एकत्रित क्षमता ५६८ किलोवॅट इतकी होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या वीज गरजेचा मोठा भाग सौर ऊर्जेतून भागविणे शक्य होणार असून, वीजखर्चात मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पात अद्ययावत व अधिक क्षमतेच्या सौर प्लेट्सचा वापर करण्यात येणार आहे. कमीत कमी जागेत अधिक क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मितीची कार्यक्षमता, देखभाल आणि नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
प्रस्तावित ३०० किलोवॅट ऑन-ग्रिड सौर ऊर्जा प्रणालीतून दररोज सरासरी १,१०० ते १,४०० युनिट, तर दर महिन्याला सरासरी ४० हजार युनिट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या वीज निर्मितीमुळे पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलात मोठी बचत होऊन भविष्यातील आर्थिक भार कमी होणार आहे. परिणामी उपलब्ध निधीचा अधिक कार्यक्षम वापर करून पाणीपुरवठा व्यवस्था आणखी सक्षम करण्यास मदत होईल.
कमी खर्चात आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून यशस्वीपणे राबविली जाणारी येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राज्यातील इतर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी पथदर्शी ठरली आहे. पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ व शाश्वत ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
अधिकचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठा योजनेच्या वीजखर्चात बचत होण्याबरोबरच येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अधिक शाश्वत, सक्षम आणि नियमित करण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यातील वीजखर्चाचा भार कमी झाल्याने ही योजना आर्थिकदृष्ट्याही अधिक सक्षम होणार आहे.
येवला तालुक्यातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळावा आणि पाणीपुरवठा योजनेचा वीजखर्च कायमस्वरूपी कमी व्हावा, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून, मंजूर झालेला हा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल येवला तालुक्याच्या विकासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.