नाशिक, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - वाहतूक कोंडीत अडकलेली दुचाकी पुढे घेण्यास सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या दोघा तरुणांनी रिक्षाचालक व त्याच्या मित्रावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जुने नाशिक येथील सरस्वती लेन भागात घडली आहे. या हल्ल्यात दोघे मित्र गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश बांडे आणि विनायक रावडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
पंचशील नगर (भद्रकाली) येथील रहिवासी व रिक्षाचालक नदीम अबरार शेख यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास नदीम शेख आणि त्यांचा मित्र अरबाज हे दोघे पंचवटी परिसरात प्रवासी भाडे सोडून भद्रकालीकडे परत जात होते.
दोघे सरस्वती लेन भागात आले असता तेथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी शेख यांच्या मित्राने पुढे डबलसिट उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला (संशयितांना) आपली गाडी पुढे घेण्याची विनंती केली. यावरून झालेल्या वादातून दुचाकीवरील दोघांनी संतप्त होऊन आधी रिक्षाचालक नदीम व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
धारदार शस्त्राने वार
मारहाणीदरम्यान संशयितांपैकी एकाने अचानक धारदार शस्त्र काढून नदीम शेख आणि अरबाज या दोघांवर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात दोघेही मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. जखमींवर उपचार सुरू असून, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.