भाजप-शिंदे सेनेपुढे महापेच... काँग्रेस, वंचितची मदत घेणार?

Share:
Main Image
Last updated: 17-Jan-2026

उल्हासनगर, (प्रतिनिधी) १७ जानेवारी - उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी चुरस शिगेला पोहोचली आहे. या अटीतटीच्या लढतीत भाजप आणि शिवसेना (युती) या दोन्ही बड्या शक्तींना बहुमताने हुलकावणी दिली असून, आता महापौर कोणाचा होणार? याचे सूत्रे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) हातात आली आहेत. दोन्ही बाजूंकडून सत्तास्थापनेसाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची मनधरणी सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजप 'मोठा भाऊ', पण बहुमतापासून दूर निवडणुकीच्या निकालात भाजपने ३८ जागा जिंकून सर्वात मोठ्या पक्षाचा मान मिळवला आहे. तर शिवसेनेने ३ पक्षांची युती करूनही ३६ जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी ३९ जागांचा आकडा गाठणे आवश्यक असताना भाजपला केवळ एका जागेची, तर शिवसेनेला तीन जागांची गरज आहे. सुरुवातीला भाजप बहुमताच्या जवळ असल्याचे दिसत होते, मात्र फेरमतमोजणीत एका जागेवर शिवसेनेच्या मित्रपक्षाचा (साई पक्ष) विजय झाल्याने भाजपचे गणित बिघडले.

वंचित आणि काँग्रेस ठरणार गेमचेंजर उल्हासनगरमध्ये सत्तेच्या चाव्या आता प्रभाग क्र. १८ मधून निवडून आलेल्या तीन नगरसेवकांच्या हातात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सुरेश सोनवणे आणि विकास खरात, तसेच काँग्रेसच्या अंजली साळवे हे तिघे ज्या बाजूला झुकतील, त्यांचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या तिन्ही उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून 'किंगमेकर' ठरलेल्या या उमेदवारांची मागणी काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या बंडखोरीचा भाजपला फायदा? शिवसेनेने टीओके, साई आणि आरपीआय (आठवले गट) यांच्यासोबत युती करून भाजपला एकटे पाडले होते. मात्र, अंतर्गत कलह, तिकीट वाटपातील कुरघोड्या आणि काही प्रभागांमधील बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसल्याचे दिसत आहे. विशेषतः प्रभाग क्र. ४, १० आणि २० मधील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला असून, याच जागांच्या जोरावर भाजपला आघाडी घेता आली.

प्रशासनाची भूमिका आणि फेरमतमोजणीचा थरार प्रभाग क्र. १६ अ मध्ये भाजपचे पवन वाघ आणि साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांच्यात झालेली लढत लक्षवेधी ठरली. दीप्ती दुधानी यांनी पुनर्मोजणीची मागणी केल्यानंतर त्यांचा ७४ मतांनी विजय झाला, ज्यामुळे भाजपचा बहुमताचा मार्ग आणखी खडतर झाला.
आता आगामी काळात युतीचे राजकारण कोणते वळण घेते आणि काँग्रेस-वंचित कोणाला साथ देतात, यावर उल्हासनगर महापालिकेचे आगामी सत्ताकारण अवलंबून असेल.

Advertisement

Comments

No comments yet.