अनाथपणा संपला, नवे आयुष्य सुरू... नाशिकच्या ८ बालकांना मिळाली मायेची सावली... ६ राष्ट्रीय व २ आंतरराष्ट्रीय...

Share:
Main Image
Last updated: 09-Sep-2026

केशव खेडकर, (नाशिक) ९ सप्टेंबर - बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कौटुंबिक वातावरण मिळावे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या दत्तक प्रक्रियेला नाशिक जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय दत्तक प्राधिकरण (CARA), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक प्रणालीद्वारे ६ राष्ट्रीय आणि २ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ८ बालकांची दत्तक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ही बालके त्यांच्या नवीन पालकांकडे सोपविण्यात आली.

बालकांच्या पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

अनाथ किंवा संस्थात्मक संगोपनात असलेल्या बालकांना कौटुंबिक जिव्हाळा आणि सुरक्षित भविष्य मिळवून देणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. मूल दत्तक घेणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून एका निरागस जीवाला नवे आयुष्य देण्याची मानवीय संधी आहे. 'CARA' च्या ऑनलाइन पद्धतीमुळे या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता, कायदेशीर सुलभता आणि कार्यक्षमता वाढली आहे.

'CARA' अंतर्गत टप्प्याटप्प्याने प्रक्रिया

Advertisement

'CARA' प्रणालीनुसार इच्छुक पालकांची ऑनलाइन नोंदणी, त्यानंतर होम स्टडी रिपोर्ट (Home Study Report), बालकाची निवड, प्रत्यक्ष भेट आणि कायदेशीर मंजुरी अशा सर्व टप्प्यांतून ही प्रक्रिया पार पडली. सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत आदेशाने बालकांचा ताबा अधिकृतरीत्या पालकांकडे सोपवण्यात आला.

शासकीय नियमांनुसार कार्यवाही

'आधार आश्रम' संचलित विशेष दत्तक ग्रहण संस्था, नाशिक येथील बालकांच्या संगोपनाची कागदपत्रे व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयामार्फत हे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा सचिन येवले, तसेच आधार आश्रमाचे राहुल जाधव व सुवर्णा जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी नव्याने पालक बनलेले नागरिक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.