नाशिक, (प्रतिनिधी) ९ सप्टेंबर - विकासाची गती कायम ठेवतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ व शाश्वत वातावरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. लोकसहभागातून विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत हरित नाशिक घडविणे हाच इको संकल्पाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कै. तुकाराम रौंदळ सभागृहात नाशिक महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘विकासगौरीचा इको बाप्पा २.०’ सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात मनपाच्या ऐतिहासिक विक्रमाची दखल घेत 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'चे अधिकृत प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्यात आले.
४० हजार शाळकरी विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक विक्रम
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक मनपाने राबवलेल्या या उपक्रमात शहरातील १२० शाळांमधील तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. या उपक्रमाची व्यापकता आणि प्रचंड विद्यार्थी सहभागामुळे याची नोंद *'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'*मध्ये झाली आहे.
या विक्रमाचे कौतुक करताना पालकमंत्री महाजन म्हणाले की, "नाशिकचा हा प्रयत्न देशभरासाठी प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थ्यांनी स्वतः घडवलेली ही गणेशमूर्ती स्वतःच्याच घरात स्थापित करावी. निसर्गाचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे."
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त संगीता नांदूरकर आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी डॉ. शिंपी यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर हिमगौरी आडके यांनी उपक्रमाच्या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मनपा प्रशासनाचे अभिनंदन केले. गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सण असल्याने गणेशमूर्तींचे विसर्जन करताना कोणत्याही प्रकारे विटंबना होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.