MPSC आंदोलनाचा भडका... पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा... या आहेत मागण्या...

Share:
Main Image
Last updated: 08-Sep-2026

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) ८ सप्टेंबर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गैरप्रकार, गोंधळ आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींचा रोष आता राज्यभरात पसरताना दिसत आहे. काल पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात आणि हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निघालेल्या भव्य आक्रोश मोर्चानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्येही MPSC विद्यार्थ्यांची तीच ताकद आणि अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळाली.

Advertisement

पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपींच्या कार्यकाळात पार पडलेल्या सर्व परीक्षांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, तसेच MPSC चे अध्यक्ष व सचिवांना तात्काळ पदावरून हटवून त्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन उभारले गेले आहे.

शासनाला इशारा: आक्रोशाचे रुपांतर रोषात होण्यापूर्वी पावले उचला

राज्यात ठिकठिकाणी निघणारे विद्यार्थ्यांचे हे विराट मोर्चे शासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. जर सरकारने अद्यापही या संवेदनशील विषयाकडे दुर्लक्ष केले किंवा एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी तातडीने निर्णय घेतले नाहीत, तर विद्यार्थ्यांचा हा असंतोष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा रोष आता केवळ पुणे किंवा छत्रपती संभाजीनगरपुरता मर्यादित राहिला नसून, आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा हाच तीव्र आक्रोश पाहायला मिळेल, असा थेट इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

एमपीएससीच्या कारभारात भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना तातडीने खड्यासारखे बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या इतर रास्त मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.