Exclusive - भारतीय हवाई दलाला मिळणार नाशिक HAL मध्ये बनलेले हे पहिले विमान.. प्रथमच स्वदेशी निर्मिती...

Share:
Main Image
Last updated: 07-Sep-2026

विकास नाशिककर, (नाशिक) ७ सप्टेंबर - भारताच्या संरक्षण क्षेत्रात आणि नाशिकच्या औद्योगिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) विभागात तयार करण्यात आलेले स्वदेशी बनावटीचे 'HTT-40' (हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40) हे अत्याधुनिक बेसिक ट्रेनर विमान आता भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यात दाखल होण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे.

इंजिनच्या पुरवठ्याअभावी काही काळ रखडलेल्या या प्रकल्पाला आता वेग आला असून, पहिल्या टप्प्यातील ३ विमानांची बॅच हवाई दलाकडे सुपूर्द केली जात आहे. यामध्ये नाशिकच्या HAL प्लांटमध्ये निर्मित एका विमानाचा समावेश आहे.

नाशिक ठरणार 'डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग'चे मुख्य केंद्र

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाशिक येथील HAL कारखान्यात HTT-40 आणि LCA-तेजस Mk1A या लढाऊ विमानांच्या उत्पादनाच्या नवीन लाईन्सचे (Production Lines) उद्घाटन केले होते. नाशिक आणि बंगळुरू येथील युनिट्स मिळून आता वर्षाला तब्बल २० 'HTT-40' विमाने तयार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. नाशिक युनिटच्या या योगदानामुळे भारताची संरक्षण आत्मनिर्भरता अधिक बळकट झाली आहे.

प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि इंजिनचा पुरवठा:

Advertisement

भारतीय हवाई दलाने आपल्या नवशिक्या वैमानिकांच्या (Rookie Pilots) प्रशिक्षणासाठी सुमारे ६,८३८ कोटी रुपये खर्चाच्या ७० स्वदेशी 'HTT-40' विमानांची नोंदणी (ऑर्डर) HAL कडे केली होती. करारानुसार वर्ष २०२५-२६ मध्ये १२ विमाने देणे अपेक्षित होते. मात्र, जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे अमेरिकेच्या 'हनीवेल' (Honeywell) कंपनीकडून इंजिन मिळण्यास उशीर झाला होता.

आताHoneywell ने TPE331-12B टर्बोप्रॉप इंजिनची पहिली बॅच HAL ला उपलब्ध करून दिली असून उर्वरित इंजिनांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. या ८८ इंजिनच्या करारांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे (Technology Transfer) भविष्यात ही इंजिने भारतातच तयार केली जाणार आहेत.

वैमानिकांच्या प्रशिक्षणात नाशिकच्या विमानाची भूमिका:

हवाई दलात नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिकांच्या पहिल्या टप्प्यातील (Stage-I) उड्डाण प्रशिक्षणासाठी HTT-40 या विमानांचा वापर केला जाईल. हे टप्पा-१ चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच वैमानिकांची फायटर, ट्रान्सपोर्ट किंवा हेलिकॉप्टर अशा विभागांत वर्गवारी केली जाते.

नाशिकमध्ये तयार झालेले हे विमान भारतीय हवाई दलाच्या भावी लढाऊ वैमानिकांना घडवण्यात अत्यंत निर्णायक भूमिका बजावणार आहे, ज्यामुळे नाशिकच्या शिरपेचात अभिमानास्पद कामगिरीची नोंद झाली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.