नाशिक, (प्रतिनिधी) ६ सप्टेंबर - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या कल्पकतेतून आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सामलेटी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या ‘मिशन नवोदय उपक्रम २०२६’ अंतर्गत आयोजित पूर्व चाचणी परीक्षेला तब्बल ९५.१२ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद नोंदवला आहे.
६ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी; ३८ केंद्रांवर शांततेत परीक्षा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, प्रश्नपद्धती आणि वेळेचे नियोजन समजून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उपस्थितीची आकडेवारी: या पूर्व चाचणीसाठी ५ तालुक्यांमधील ३८ परीक्षा केंद्रांवर ६,००३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५,७१० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर २९३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
OMR पद्धतीचा प्रत्यक्ष सराव: जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड परीक्षेच्या (JNVST) धर्तीवर ही परीक्षा OMR शीटवर घेण्यात आली. यामध्ये ८० प्रश्नांसाठी १०० गुण ठेवण्यात आले असून मानसिक क्षमता चाचणी (MAT), पर्यावरण अभ्यास (EVS), अंकगणित आणि भाषा चाचणी या विषयांचा समावेश होता.
१५० विद्यार्थ्यांना मिळणार 'स्पेशल ट्रेनिंग'
पूर्व चाचणीच्या निकालाच्या आधारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सर्वोत्तम १० विद्यार्थी याप्रमाणे एकूण १५० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
निवड झालेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावरील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत विशेष मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा आणि ऑनलाईन/ऑफलाईन तासिकांचे आयोजन केले जाईल.
नोव्हेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या मुख्य नवोदय प्रवेश परीक्षेपर्यंत ही तयारी सातत्याने करून घेतली जाणार आहे.
काटेकोर नियोजन अन् समन्वय
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी २४ विद्यार्थ्यांमागे एक पर्यवेक्षक तैनात करण्यात आला होता. OMR शीट्स सुरक्षितरीत्या सीलबंद करून जिल्हास्तरावर संकलित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी प्रकल्प प्रमुख अल्पा देशमुख, समन्वयक विजय बागुल, प्रशांत बिरे आणि 'विनोबा टीम'ने विशेष परिश्रम घेतले.
प्रशासनाची प्रतिक्रिया:
"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता आहे, गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. पूर्व चाचणीतून निवडल्या जाणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण देऊन नवोदय विद्यालयात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे."
— ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक
"या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचा आत्मविश्वास निर्माण होईल. पूर्व चाचणीच्या निकालावरून विद्यार्थ्यांची गरज ओळखून पुढील प्रशिक्षणाचे सूक्ष्म नियोजन केले जाईल."
— साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. नाशिक