अंबडमध्ये तो ट्रक रस्त्यात कसा आणि का फसला? नाशिक महापालिकेने केला हा खुलासा...

Share:
Main Image
Last updated: 05-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर - नाशिकच्या अंबड परिसरात साईड शोल्डरमध्ये ट्रक अडकल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने (NMC) संबंधित घटनेची सविस्तर वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. सदर घटना मुख्य रस्ता खचल्यामुळे घडलेली नसून, अमृत योजनेच्या कामानंतर सुरू असलेल्या साईड शोल्डरच्या पुनर्स्थापनेदरम्यान घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अमृत योजनेच्या कामाची नेमकी स्थिती

अंबड परिसरात अमृत योजनेअंतर्गत १००० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

ही जलवाहिनी मुख्य रस्त्याखाली टाकण्यात आलेली नसून रस्त्यालगतच्या साईड शोल्डरमध्ये टाकण्यात आली आहे, त्यामुळे जलवाहिनीसाठीचे खोदकाम मुख्य वाहतूक मार्गावर झालेले नाही.

संबंधित साईड शोल्डर हा यापूर्वी नियमित रस्ता किंवा वाहतुकीचा मार्ग नव्हता. मात्र, मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिक असल्याने काही वाहने प्रसंगी या भागाचा वापर करतात, ज्यामुळे हा भाग मुख्य रस्त्याचा हिस्सा असल्याचा गैरसमज होऊ शकतो.

कंत्राटदाराचा ट्रकच झाला होता अडकला

ज्या घटनेतील ट्रक अडकल्याचे वृत्त समोर आले, तो मुख्य रस्त्यावरून जाणारे बाहेरील वाहन नसून साईड शोल्डरच्या पुनर्स्थापनेसाठी खडी घेऊन आलेला संबंधित कंत्राटदाराचा ट्रक आहे.

Advertisement

पुनर्स्थापनेचे साहित्य खाली करत असताना हा ट्रक साईड शोल्डरमध्ये अडकला होता. त्यामुळे ही घटना मुख्य रस्ता खचल्यामुळे घडलेली नसून, सुरू असलेल्या पुनर्स्थापना कामादरम्यान घडली आहे.

पुनर्स्थापनेचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संबंधित साईड शोल्डरच्या पुनर्स्थापनेचे काम गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे.

सुमारे १.५ किलोमीटर लांबीच्या या भागाची पुनर्स्थापना करण्यात येत असून, हे काम पुढील सात दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी कामाला गती देण्यात आली असून, काम पूर्ण झाल्यानंतर साईड शोल्डर पूर्ववत केले जाणार आहे.

माध्यमांना वस्तुस्थितीची खातरजमा करण्याचे आवाहन

महानगरपालिकेच्या कामांशी संबंधित कोणतीही घटना किंवा वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी माध्यमांनी संबंधित विभागाकडून वस्तुस्थितीची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे. यामुळे अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता टळेल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.