शासकीय आश्रमशाळातील शिक्षक भरती... आदिवासी विकास विभागाकडून वेळापत्रक जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 04-Sep-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ०४ सप्टेंबर -  महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. ‘पवित्र पोर्टल’मार्फत शिफारस प्राप्त १,६०० उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस ३ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून याबाबतचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत पेसा (PESA) व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील एकूण २ हजार ४२१ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीविना निवडीसाठी प्राप्त झालेल्या १,६०० उमेदवारांमध्ये प्राथमिक शिक्षक (९२७), माध्यमिक शिक्षक (४२१) आणि उच्च माध्यमिक शिक्षक (२५२) पदांचा समावेश आहे.

विभागनिहाय उमेदवार संख्या:

नाशिक विभाग: ५८८ (सर्वाधिक)

ठाणे विभाग: ४२४

नागपूर विभाग: २९६

अमरावती विभाग: २९२

क्षेत्रनिहाय व माध्यमनिहाय पदसंख्या:

पेसा (PESA) क्षेत्र (एकूण ४५९): प्राथमिक मराठी- १९६, प्राथमिक इंग्रजी- १६, माध्यमिक मराठी- ९४, माध्यमिक इंग्रजी- २, उच्च माध्यमिक- १५१.

नॉन-पेसा क्षेत्र (एकूण १,१४१): प्राथमिक मराठी- ५९३, प्राथमिक इंग्रजी- १२२, माध्यमिक मराठी- ३०२, माध्यमिक इंग्रजी- २३, उच्च माध्यमिक- १०१.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

पडताळणीसाठी उमेदवारांनी 'पवित्र पोर्टल'वर नोंदवलेल्या माहितीच्या पुष्ट्यर्थ सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि स्वयंप्रमाणित (Self-attested) छायांकित प्रतींचे एक संच सोबत आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी त्यांना दिलेल्या वेळेत व केंद्रावर उपस्थित राहावे; अनुपस्थित राहिल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी उमेदवाराचीच असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सर्व पात्र उमेदवारांना वेळेत पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी व अद्ययावत माहिती विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Comments

No comments yet.