अक्षय काळे, (मुंबई) ०४ सप्टेंबर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी १ सप्टेंबर २०२६ पासून 'एनसीएमसी' (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड - NCMC) अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, कार्ड वितरणातील अडचणी, सर्व्हरवरील ताण आणि आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डच्या सक्तीतून मुदतवाढ दिली आहे.
काय आहे निर्णय?
कार्ड वितरणात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या. काही ठिकाणी मशीनमधून सवलतीचा पर्याय हटवल्याने प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत महिला व सवलतधारकांना १४ सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणेच मॅन्युअल तिकिटावर सवलतीसह प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
प्रवाशांना दिलासा:
या निर्णयामुळे गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या हजारो महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, कार्ड काढण्यासाठी होणारी धावपळ व ताटकळणे सध्या टळले आहे.