दरमहा ५० हजार खंडणीची मागणी... सातपूरच्या दुकानदाराची पोलिसात धाव...

Share:
Main Image
Last updated: 03-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ सप्टेंबर - दारूच्या बाटल्या विकत घेतल्यानंतर पैसे मागितल्याचा राग येऊन तीन संशयितांनी दारू दुकानाच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत दरमहा ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातपूर गावातील 'रतन वाईन शॉप'मध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद डोंगरे, आकाश सोनवणे आणि राहुल जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी प्रकाश काळू कन्नोर (रा. पाटील गार्डन, इंदिरानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पैसे मागितल्याने आरेरावी अन् धमकी

Advertisement

फिर्यादी प्रकाश कन्नोर हे सातपूर गावातील 'रतन वाईन्स' या दारूच्या दुकानात व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून काम पाहतात. बुधवारी (दि. २) दुपारी ते दुकानात नेहमीप्रमाणे काम करत असताना तिघे संशयित तेथे दारूच्या बाटल्या घेण्यासाठी आले. संशयितांनी दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्यावर कन्नोर यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

पैसे मागितल्याचा राग आल्याने संशयितांनी दुकानातील कामगारांना आरेरावी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. "दर महिन्याला ५० हजार रुपये द्यायचे, तुझ्या मालकाने पैसे दिले नाहीत तर आमच्याशी गाठ आहे," अशी धमकी देत संशयितांनी दरमहा ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार देसले करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.