जुना लॅपटॉप/कॉम्प्युटर होणार सुपरफास्ट... रिलायन्स जिओने आणली ही धमाकेदार ऑफर... ८ वर्षे जुना कॉम्प्युटरही होणार AI रेडी...

Share:
Main Image
Last updated: 03-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) ३ सप्टेंबर - तुमचा जुना लॅपटॉप किंवा डेस्कटॉप स्लो झाला असेल, तर लगेच नवीन कॉम्प्युटर खरेदी करून हजारो रुपये खर्च करण्याची आता गरज भासणार नाही. रिलायन्स जिओने 'जिओ पीसी' (JioPC) ही विशेष क्लाउड आधारित सेवा सादर केली असून, याद्वारे कोणताही जुना कॉम्प्युटर अतिशय पॉवरफुल बनवता येणार आहे. या सेवेमुळे युजर्सना कोणतेही नवीन हार्डवेअर न बसवता १६GB पर्यंत RAM आणि १TB पर्यंत स्टोरेजचा ॲक्सेस थेट त्यांच्या जुन्या डिव्हाइसवर मिळणार आहे.

सर्व इंटरनेट युजर्ससाठी सेवा उपलब्ध

यापूर्वी 'JioPC' ची सेवा केवळ जिओ होम ब्रॉडबँड ग्राहकांसाठी मर्यादित होती. मात्र, आता कंपनीने ही सेवा स्टँडअलोन सब्सक्रिप्शन म्हणून सर्वांसाठी खुली केली आहे. म्हणजेच, तुमच्याकडे कोणत्याही टेलिकॉम किंवा ब्रॉडबँड कंपनीचे (उदा. एअरटेल, व्हीआय इ.) इंटरनेट कनेक्शन असले, तरीही तुम्ही JioPC वापरू शकता. ही सेवा अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत ॲक्टिव्हेट होते आणि यासाठी कोणतेही डेटा माइग्रेशन किंवा हार्डवेअर बदलण्याची गरज पडत नाही.

८ वर्षे जुना कॉम्प्युटरही होणार 'AI-रेडी'

जिओच्या दाव्यानुसार, JioPC मुळे ८ वर्षे जुना कॉम्प्युटरसुद्धा आजच्या अत्याधुनिक AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ॲप्ससाठी आवश्यक असलेला परफॉर्मन्स आणि स्पीड सहज देऊ शकतो. कॉम्प्युटिंगचा मोठा भाग जिओच्या हाय-स्पीड 'क्लाउड'वर (Cloud Systems) होत असल्याने, हेवी AI प्रोसेसिंग, मल्टिटास्किंग आणि मोठ्या स्टोरेजच्या गरजा जुन्या डिव्हाइसवरच विनाअडथळा पूर्ण होतात.

JioPC चे दर आणि प्लॅन्स (GST सह):

जिओने या सेवेसाठी परवडणारे विविध कालावधीचे प्लॅन्स सादर केले आहेत:

२ महिन्यांचा प्लॅन:

८GB RAM + ५००GB स्टोरेज: ₹१,०००

१६GB RAM + १TB स्टोरेज (JioPC Ultra): ₹१,२००

५ महिन्यांचा प्लॅन:

८GB RAM + ५००GB स्टोरेज: ₹२,०००

१६GB RAM + १TB स्टोरेज (JioPC Ultra): ₹२,५००

१२ महिन्यांचा प्लॅन (१० + २ महिने मोफत):

८GB RAM + ५००GB स्टोरेज: ₹४,०००

१६GB RAM + १TB स्टोरेज (JioPC Ultra): ₹५,०००

(टीप: वरील सर्व किमतींमध्ये GST समाविष्ट आहे.)

चांगल्या इंटरनेटची गरज

JioPC ही सेवा संपूर्णपणे क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असल्याने, ही सेवा वापरण्यासाठी युजर्सकडे स्थिर आणि वेगवान इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. ही सेवा ब्रॉडबँड कनेक्शन व्यतिरिक्त कोणत्याही विश्वासार्ह 4G किंवा 5G नेटवर्कवर सहज वापरता येईल.

Comments

No comments yet.