नाशिक, (प्रतिनिधी) २ सप्टेंबर - सातपूर परिसरातील रस्त्यांची दुर्दशा निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे भीषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. सातपूर पपया नर्सरी रोडवर संदीप फाऊंडेशनच्या बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सातपूर परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेला हा सलग दुसऱ्या दिवसाचा बळी आहे.
रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा दुर्दैवी अंत
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी माहेरी आली होती. सण आटोपून पतीसोबत जात असताना सातपूर पपया नर्सरी रोडवरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्याच वेळी संदीप फाऊंडेशनच्या बसचा धक्का लागल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या विवाहितेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रक्षाबंधनाचा सण साजरा करून परतणाऱ्या लेकीचा हा प्रवास शेवटचा ठरल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी अपघात: प्रशासनाविरोधात संतापाची लाट
सातपूर एमआयडीसी परिसरात रस्त्यांची झालेली चाळण, खड्डे आणि पावसाळ्यामुळे साचलेला चिखल यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आदल्याच दिवशी निलय कंपनी, हनुमान मंदिरासमोर झालेल्या अपघातात राहुल नगर (पवारवाडी, जेलरोड) येथील ४३ वर्षीय सुजित राजेंद्र गायकवाड या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. महापालिकेने रस्ता सुस्थितीत असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात खराब रस्ते, चिखल आणि बेशिस्त दुहेरी वाहतुकीमुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचे समोर येत आहे.
कुंभमेळा विकासकामे आणि नागरिकांचे हाल
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली विविध विकासकामे, रस्त्यांची रखडलेली दुरुस्ती आणि खोदकामामुळे सातपूरसह संपूर्ण नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सलग दोन दिवसांत दोन निष्पापांचे बळी गेल्यानंतर नाशिककरांमधून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. "आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?" असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.