नाशिक, (प्रतिनिधी) १ सप्टेंबर - शहरातील शरणपूर रोड, उंटवाडी आणि राजीवनगर या तीन वेगवेगळ्या भागांत सोमवारी (दि. ३१) तिघांनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. या तिन्ही घटनांमधील आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी सरकारवाडा, मुंबईनाका आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
शरणपूर रोड येथे चाळीस वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
शरणपूर रोड भागातील राज टॉवर येथे राहणाऱ्या महादेव उद्धव माने (वय ४०) यांनी सोमवारी राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच ज्ञानेश्वर महाजन यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार माळोदे पुढील तपास करत आहेत.
उंटवाडीत २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली
उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर परिसरात राहणाऱ्या राकेश नवसू वळवी (वय २५) या तरुणाने सोमवारी रात्री अज्ञात कारणावरून राहत्या घरात पंख्याला शाल बांधून गळफास घेतला. त्याचा भाऊ जगन वळवी याने त्याला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद मुंबईनाका पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.
राजीवनगर येथे ३९ वर्षीय पुरुषाची आत्महत्या
तिसरी घटना राजीवनगर येथील निलमणी कॉलनीत घडली. येथील अक्षय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दर्शन दिलीप लोहार (वय ३९) या व्यक्तीने सोमवारी दुपारी बेडरूममधील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुशांत काळे यांनी दिलेल्या माहितीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार पारणकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.