आदिवासी विद्यार्थ्यांचे नाशिकमधील उपोषण चिघळले... काँग्रेस नेत्यांची आंदोलनस्थळी धाव... फडणवीस सरकारवर हल्लाबोल...

Share:
Main Image
Last updated: 01-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ सप्टेंबर - गेल्या १५-२० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांकडे महायुती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवता येणार नसून, त्यांचे आश्वासन म्हणजे लबाडाघरचे जेवण आहे. नाशिक विभागात आदिवासींची संख्या मोठी असल्याने सरकारने नाशिकमध्ये मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

नाशिक येथे आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

आदिवासी विकासमंत्र्यांचा राजीनामा घ्या: हर्षवर्धन सपकाळ

विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "आदिवासी विकास विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला असून योजनांचा निधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. मागील दोन वर्षांत तब्बल ८९२ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, याला थेट फडणवीस सरकार जबाबदार आहे. या विभागातील अनागोंदी कारभार पाहता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा."

Advertisement

याशिवाय बिंदू नामावलीतील त्रुटी दूर करणे, आश्रमशाळांमधील निकृष्ट दर्जाचे अन्न सुधारणे आणि 'सेंट्रल किचन' पद्धत तातडीने बंद करणे या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणीही त्यांनी केली.

'राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे सरकार खडबडून जागे'

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. आता ते २ सप्टेंबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत असल्याने धास्तावलेले भाजप सरकार घाईघाईने मागण्या मान्य करण्याचे नाटक करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. नाशिकप्रमाणेच पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही सुरू असलेल्या आंदोलनातील प्रतिनिधींशी काँग्रेस संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विजय वडेट्टीवार आणि डॉ. विक्रांत भुरिया यांनीही आदिवासी विभागातील कथित गैरव्यवहारांवरून राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.