सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रियेत मोठे बदल... असे आहेत नवे कडक नियम...

Share:
Main Image
Last updated: 03-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) ३ सप्टेंबर - राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध करण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. भरती प्रक्रियेत गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी संपूर्ण मुलाखतींचे CCTV रेकॉर्डिंग करणे आणि अंतिम निवड यादी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

१. जाहिरात मंजुरी आणि वृत्तपत्रांत प्रसिद्धी

विद्यापीठाची मान्यता: शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाल्यानंतर संस्थांना जाहिरातीचा मसुदा विद्यापीठाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागेल. शैक्षणिक पात्रता, सामाजिक व समांतर आरक्षण योग्य असल्याची पडताळणी विद्यापीठाचा मागासवर्ग कक्ष करेल.

जाहिरात देणे अनिवार्य: राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रासह माहिती व जनसंपर्क विभागाने घोषित केलेल्या 'अ' किंवा 'ब' वर्गातील राज्यस्तरीय वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक असेल.

२. अर्जाची पद्धत आणि शॉर्टलिस्टिंगचे निकष

ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज: संस्थांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे अनिवार्य आहे. मात्र, उमेदवाराने ऑफलाइन अर्ज दिल्यास तोही स्वीकारावा लागेल आणि दोन्ही प्रकारच्या अर्जांची पावती (पोहोच) उमेदवाराला देणे बंधनकारक राहील.

यूजीसी निकषांनुसार निवड: मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड (Shortlisting) करताना UGC च्या १८ जुलै २०१८ च्या अधिसूचनेतील Appendix-II (Table 3B) चा वापर करावा लागेल.

माहिती सार्वजनिक करणे: शॉर्टलिस्ट केलेले निकष, प्राप्त अर्जांची यादी आणि उमेदवारांना मिळालेले गुण महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच विद्यापीठाकडे ऑनलाइन सादर करावे लागतील.

३. मुलाखत प्रक्रिया आणि CCTV रेकॉर्डिंगचे कडक नियम

CCTV रेकॉर्डिंग: भरतीत गैरप्रकार रोखण्यासाठी संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचे CCTV रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गोपनीय दस्तऐवज: हे रेकॉर्डिंग मुलाखतीच्या तारखेपासून किमान १ वर्ष गोपनीय दस्तऐवज म्हणून सुरक्षित ठेवावे लागेल.

तक्रार किंवा न्यायालयीन प्रकरण असल्यास: भरती प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार, आक्षेप किंवा न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यास अंतिम निकाल लागेपर्यंत हे रेकॉर्डिंग नष्ट करता येणार नाही.

४. अंतिम निवड यादी अन् मान्यता

विद्यापीठाने मुलाखतीतील गुणांकनाचे निकष निश्चित करून त्यानुसार प्रक्रिया पार पडल्याची खातरजमा करावी.

विद्यापीठाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांची यादी संस्थेच्या किंवा महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागेल.

५. अनियमितता आढळल्यास कडक कारवाईचा इशारा

भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधित संस्था, विद्यापीठ, निवड समितीचे सदस्य आणि शासन प्रतिनिधी यांच्यावर सक्षम प्राधिकरणाद्वारे थेट जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

?s=20

Comments

No comments yet.