अक्षय काळे, (मुंबई) ३१ ऑगस्ट - महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षणाची (SIR) प्रारूप मतदार यादी (Draft Roll) सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप मतदार यादीतून राज्यातील तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तांत्रिक अडचणी, फॉर्म जमा न होणे आणि माहितीचे डिजिटायझेशन न झाल्याने या मतदारांचा समावेश प्रारूप यादीत होऊ शकलेला नाही.
नावे वगळण्याची मुख्य कारणे :
निवडणूक आयोगाकडून घरोघरी जाऊन करण्यात आलेली पडताळणी, अर्जांचे डिजिटायझेशन न होणे यासह अनेक तांत्रिक कारणांमुळे ही नावे समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. याशिवाय दिलेल्या पत्त्यावर अनुपस्थित असणारे, इतरत्र स्थलांतरित झालेले, मृत व्यक्ती, परदेशात स्थायिक झालेले तसेच दोन ठिकाणी नोंद असलेले (दुबार) मतदार यांचा या वगळण्यात आलेल्या नावांमध्ये समावेश आहे.
दिल्लीतही ४७ लाखांहून अधिक नावे बाद :
महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीमध्येही मोठ्या प्रमाणावर मतदार यादीतून नावे हटवण्यात आली आहेत. दिल्लीतील १ कोटी ४५ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल ४७ लाख ५६ हजार ७२२ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असून सुमारे ९७ लाख ५३ हजार मतदारांची नोंद डिजिटाईझ झाली आहे.
प्रारूप यादीत नाव नसल्यास काय करावे?
ज्या मतदारांचे नाव एसआयआरच्या (SIR) प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नसेल, त्यांचे नाव रद्द झाले असा अर्थ होत नाही. त्यांना आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान दावे आणि आक्षेप नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
या दाव्यांचे निराकरण करून ४ नोव्हेंबर रोजी SIR नंतरची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
नाव कसे तपासायचे?
१. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO Maharashtra) अधिकृत संकेतस्थळावर किंवा 'Voters' Service Portal' (voters.eci.gov.in) वर जा.
२. 'Search in Electoral Roll' वर क्लिक करून आपला EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) किंवा वैयक्तिक माहिती टाका.
३. जर यादीत नाव नसेल, तर ३० सप्टेंबरपूर्वी फॉर्म भरून नाव नोंदणी किंवा दुरुस्तीचा अर्ज दाखल करा.