पंढरपूर, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - महाराष्ट्राची शान आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या पैठणीच्या नावाने बाजारात होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला आता पूर्णपणे वेसण घालण्यात येणार आहे. ओरिजनल पैठणीच्या नावाखाली सेमी किंवा डुप्लिकेट पैठणी विकल्या जाणाऱ्या प्रकारांवर मात करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने एक नवी योजना आखली आहे. यापुढे खऱ्या पैठणीवर खास बारकोड आणि लोगो देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले असता मंत्री सावकारे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे आणि इतर पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
बारकोड स्कॅन करताच मिळणार सर्व माहिती
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना एका क्लिकवर पैठणीची खरी ओळख पटवता येईल. बारकोड स्कॅन केल्यानंतर:
धाग्याची माहिती: साडी तयार करण्यासाठी कोणता धागा (सिल्क/जरी) वापरला आहे.
कारागिराचा तपशील: पैठणी कोणत्या गावात आणि कोणत्या कारागिराने विणली आहे, याची इत्यंभूत माहिती ग्राहकांना थेट पाहायला मिळेल.
पैठणी हा कलेचा अनमोल नमुना
साडीच्या निर्मितीबद्दल बोलताना सावकारे म्हणाले, "पैठणी ही केवळ साडी नसून महाराष्ट्राच्या समृद्ध कलेचा भाग आहे. एक ओरिजनल पैठणी हाताने तयार करण्यासाठी कारागिरांना तब्बल २० ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. बाजारात वाढत्या मागणीच्या तुलनेत उत्पादन वाढवण्यासाठी कारागिरांची संख्या वाढवण्यावर विभाग भर देत आहे."
तसेच वस्त्रोद्योग विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून पैठणीला मोठा प्रतिसाद आणि चांगली मागणी मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नव्या 'बारकोड आणि लोगो' व्यवस्थेमुळे खऱ्या कारागिरांच्या कष्टाचा सन्मान होईल आणि ग्राहकांची फसवणूक पूर्णपणे टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.