नाशिक, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - मुंबई पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करत, सायबर भामट्यांनी नाशिकमधील एका नागरिकाला मनी लाँड्रिंग प्रकरणाचा धाक दाखवून तब्बल ४२ लाख ६० हजार ४३४ रुपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक आणि स्थावर मालमत्तेची सर्व माहिती मिळवून, 'डिजिटल अरेस्ट' आणि अटकेची भीती दाखवून ही भामटेगिरी करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) संशयित सायबर भामट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला. आपण मुंबई पोलीस बोलत असल्याचे सांगून भामट्यांनी तक्रारदारास व्हॉईस कॉल, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगद्वारे जाळ्यात ओढले. "तुमचा मनी लाँड्रिंग (बेकायदेशीर पैशांची देवघेव) सारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग असून, तुमच्यावर अटकेची कारवाई केली जात आहे," अशी भीती त्यांनी तक्रारदाराला दाखवली.
तपासाचा बनाव करत भामट्यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या सर्व बँक खात्यांची, ठेवींची आणि स्थावर मालमत्तेची अत्यंत संवेदनशील माहिती मिळवली. त्यानंतर, "तुमच्या बँक खात्यात जमा असलेली सर्व रक्कम रिझर्व्ह बँकेच्या (RBI) माध्यमातून तपासली जाणार आहे," असा बहाणा करून, त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास तक्रारदाराला भाग पाडले.
अटकेच्या भीतीने हादरलेल्या तक्रारदाराने दि. २४ ते २८ ऑगस्ट या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने एकूण ४२ लाख ६० हजार ४३४ रुपये भामट्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पथक पुढील अधिक तपास करत आहे.
दरम्यान, नाशिक सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे की, कोणतेही पोलीस दल, सीबीआय, किंवा तपास यंत्रणा अशा प्रकारे व्हिडिओ कॉलद्वारे कोणालाही 'डिजिटल अरेस्ट' करत नाही किंवा खात्यातील पैसे हस्तांतरित करण्यास सांगत नाही. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा '१९३०' या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.