नाशिक, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर' सिन्नर ते इगतपुरी टप्प्यादरम्यान ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. 'इंटेलीजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS) साठी गॅन्ट्री बसवण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिली आहे.
वाहतूक बंदची वेळ आणि वेळापत्रक:
महामार्ग पोलिसांच्या परवानगीने खालील वेळेत संबंधित दिशेने वाहतूक दररोज १ तासासाठी पूर्णपणे बंद राहील:
दुपारी १२:०० ते १:०० (मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर)
दुपारी ३:०० ते ४:०० (नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर)
टप्प्यांनुसार वेळापत्रक:
३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर: सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंजदरम्यान वाहतूक बंद राहील.
४, ५ आणि ७ सप्टेंबर: भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान वाहतूक बंद राहील.
काय आहे ITMS प्रणाली?
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि शिस्त पाळण्यासाठी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वर आधारित उच्च क्षमतेचे कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जात आहेत. यामुळे वेग मर्यादा ओलांडणे, चुकीच्या लेनमधून गाडी चालवणे, सीटबेल्ट न लावणे किंवा मोबाईलवर बोलणे अशा १७ प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट ऑनलाईन ई-चलान (दंड) फाडले जाईल.
MSRDC ने या काळात वाहनधारकांना आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेनुसार करण्याचे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.