नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग नक्की कोणता? खासदार वाजे आणि भगरे स्पष्टच बोलले...

Share:
Main Image
Last updated: 30-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ३० ऑगस्ट - नाशिक–पुणे रेल्वे मार्गाबाबत सध्या प्रसिद्ध होत असलेल्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नाशिक–शिर्डीमार्गे नाशिक–पुणे रेल्वेचा अंतिम मार्ग निश्चित झाला असून प्रकल्पाला पूर्ण मंजुरी मिळाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही, असे स्पष्टीकरण नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिले आहे.

प्रस्तावित नाशिक–सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–चाकण–पुणे या थेट मार्गावर नारायणगावजवळील खोडद येथील 'जीएमआरटी' (GMRT) वेधशाळेच्या वैज्ञानिक कार्यावर संभाव्य परिणामाचा मुद्दा उपस्थित झाल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती विविध पर्यायांचा तांत्रिक व शास्त्रीय अभ्यास करत असून, तिचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे अहवालापूर्वी कोणताही मार्ग अंतिम झाल्याचे मानणे अयोग्य आहे.

नाशिक–शिर्डी (९५ किमी) आणि अहिल्यानगर–पुणे (१३३ किमी) हे स्वतंत्र टप्पे असून त्यांच्या डीपीआर किंवा भूसंपादनावरून संपूर्ण नाशिक-पुणे मार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. जीएमआरटीसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रकल्पाचे संरक्षण करून बोगदा, उन्नत मार्ग (Elevated Route) किंवा संरेखनातील बदलांसारखे तांत्रिक पर्याय तपासून थेट मार्ग शक्य आहे का, याचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी खासदार वाजे यांनी केली आहे.

प्रमुख नेत्यांची प्रतिक्रिया:

Advertisement

"जीएमआरटीचे संरक्षण आणि नाशिक–पुणे रेल्वे हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. घाईघाईने कोणताही मार्ग अंतिम न करता काकोडकर समितीचा अहवाल व सर्व तांत्रिक पर्यायांचा विचार करूनच व्यापक जनहिताचा निर्णय घेतला गेला पाहिजे."

— राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक)

"नाशिक–पुणे रेल्वे हा नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक, कृषी आणि पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. काकोडकर समितीचा अहवाल येण्यापूर्वी कोणताही मार्ग अंतिम झाल्याचा दावा करणे योग्य नाही."

— भास्कर भगरे (खासदार, दिंडोरी)

Advertisement

Comments

No comments yet.