नाशकात आतापर्यंत ३९,५०० वृक्षांची प्रत्यक्ष लागवड... उद्या इतके हजार लागणार...

Share:
Main Image
Last updated: 29-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित व पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने कुंभमेळा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन मान्सून’ या हरित मोहिमेने आता १० व्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या टप्प्यांतर्गत रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गंगापूर धरण परिसर, चैतन्य फार्मसमोर, नाशिक येथे ५ हजार देशी वृक्षांची भव्य लागवड करण्यात येणार आहे.

‘मिशन ग्रीन मान्सून’ ही केवळ वृक्षारोपणाची मोहीम न राहता वृक्षलागवड, वृक्षवाटप, संवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृती यांची व्यापक लोकचळवळ म्हणून पुढे येत आहे. गेल्या काही टप्प्यांमध्ये नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी, युवक, पर्यावरणप्रेमी तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे.

९ टप्प्यांत ५० हजारांहून अधिक वृक्षांचा टप्पा पार

मोहिमेच्या आतापर्यंतच्या ९ टप्प्यांत ३९,५०० देशी वृक्षांची प्रत्यक्ष लागवड करण्यात आली असून, मागणीनुसार १०,७७५ देशी रोपांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष लागवड आणि वृक्षवाटप मिळून आतापर्यंत ५०,२७५ वृक्षांचा टप्पा पूर्ण झाला आहे.

आता १० व्या टप्प्यात गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ५ हजार देशी वृक्षांच्या लागवडीमुळे या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढणार असून, ५५ हजार वृक्षांच्या दिशेने ‘मिशन ग्रीन मान्सून’ची वाटचाल सुरू होणार आहे.

धरण-कालवा परिसरही होणार हिरवाईने समृद्ध

Advertisement

‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि कालवे परिसरात २५ हजारांहून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प जलसंपदा विभागाने केला आहे. या व्यापक उपक्रमाची सुरुवात गंगापूर धरण परिसरातून ५ हजार देशी वृक्षांच्या लागवडीने होत आहे.

धरण परिसरातील मोकळ्या जागा, कालवा परिसर आणि उपलब्ध शासकीय जागांवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप देशी वृक्षांच्या प्रजातींची लागवड करून या परिसराचे पर्यावरणीय संवर्धन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

‘झाड लावण्याबरोबरच झाड जगविणे महत्त्वाचे’ — ना. गिरीश महाजन

याबाबत ना. गिरीश महाजन म्हणाले, “नाशिकला हरित आणि पर्यावरणपूरक शहर-जिल्हा बनविणे हा ‘उन्नत नाशिक अभियान’चा महत्त्वाचा भाग आहे. वृक्षारोपण हा एक दिवसाचा कार्यक्रम नसून पुढील अनेक वर्षांची जबाबदारी आहे. झाडे लावण्यासोबतच प्रत्येक झाड जगविणे, त्याला नियमित पाणी देणे आणि त्याचे सातत्यपूर्ण संवर्धन करणे आवश्यक आहे.”

“आज आपण लावलेले झाड हे उद्याच्या पिढीसाठी सावली, शुद्ध हवा, पाणी आणि पर्यावरणीय सुरक्षिततेची हमी देणार आहे. त्यामुळे ‘मिशन ग्रीन मान्सून’ ही शासनाची नव्हे, तर नाशिककरांची सामूहिक हरित चळवळ व्हावी,” असे आवाहनही त्यांनी केले.

गंगापूर धरण परिसरातील ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी आणि वृक्षप्रेमींनी रविवारी होणाऱ्या या १० व्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘एक झाड—एक जबाबदारी’ या भावनेने या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकच्या विकासासोबतच नाशिकची हिरवाई वाढविण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेल्या ‘मिशन ग्रीन मान्सून’मुळे उन्नत नाशिक अभियानाला आता व्यापक लोकसहभागाची जोड मिळत असून, नाशिकच्या हरित परिवर्तनाची ही चळवळ सातत्याने पुढे सरकत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.