केशव खेडकर, (नाशिक) २९ ऑगस्ट - पर्यावरण संवर्धन, भूजल पुनर्भरण आणि नद्यांचा अविरत प्रवाह यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) माध्यमातून राबविण्यात येत असलेले ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे काम अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक असून हे मॉडेल संपूर्ण देशातील महामार्गांवर राबविण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार ‘वॉटरमन ऑफ इंडिया’ डॉ. राजेंद्र सिंह यांनी काढले. नाशिक परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत १६ ठिकाणी भूजल पुनर्भरणाची कामे हाती घेण्यात आली असून, यातील पायलट प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
मूळ निविदेत समाविष्ट नसतानाही पर्यावरणप्रेमींच्या आग्रहास्तव एनएचएआयने हा उपक्रम स्वीकारल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे पावसाचे कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.
हिरावाडी आणि मखमलाबाद वन उद्यानाची पाहणी
आपल्या दौऱ्यादरम्यान डॉ. राजेंद्र सिंह यांनी हिरावाडी व मखमलाबाद येथील ‘वन उद्यानां’ची प्रत्यक्ष पाहणी केली:
वृक्षसंवर्धनाची पाहणी: ना. गिरीश महाजन यांच्या सहकार्याने राजमंद्री (आंध्र प्रदेश) येथून आणलेल्या विविध वृक्षांची सद्यस्थिती व संवर्धनाच्या उपायांची त्यांनी माहिती घेतली.
हरित पट्ट्याचे कौतुक: लावलेली झाडे उत्तम पद्धतीने जगवून शहरात हरित पट्टा निर्माण करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असून, इतर शहरांनीही असे मॉडेल राबवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाशिकमध्ये जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि वृक्षसंवर्धनाचा एकत्रित विचार करून सुरू असलेला हा प्रयत्न शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी, ओएसडी संदीप जाधव, राजेश पंडित, चिन्मय उदगीरकर, ज्योती माळसे यांच्यासह विविध पर्यावरणप्रेमी आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.