अमृताश्रम स्वामी महाराजांच्या वारकरी कीर्तनाने नाशिककर मंत्रमुग्ध...

Share:
Main Image
Last updated: 29-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट -  नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित ‘कुंभ भक्ती संगम’ या आध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सवाचा श्रीगणेशा गुरुवारी मोठ्या उत्साहात झाला. नाशिक येथील ठक्कर डोम येथे आयोजित या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा अनुपम संगम पाहायला मिळाला. सायंकाळच्या सत्रात पूज्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या ओघवत्या आणि भावपूर्ण वारकरी कीर्तनाने उपस्थित शेकडो भाविकांना आणि नाशिककरांना मंत्रमुग्ध केले.

अमृताश्रम स्वामी महाराजांचे प्रबोधनात्मक कीर्तन

आपल्या कीर्तनातून अमृताश्रम स्वामी महाराजांनी भारतीय संत परंपरेतील आध्यात्मिक विचार आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. "संतांनी समाजाला दिलेला समता, बंधुभाव, सदाचार आणि सेवेचा संदेश आजच्या काळातही तितकाच कटिबद्ध आणि आवश्यक आहे," असे त्यांनी नमूद केले. केवळ वक्तृत्व किंवा मनोरंजन न राहता अशा सोहळ्यांतून समाजाला योग्य विचार, संस्कार आणि अध्यात्माची नवी दिशा मिळायला हवी, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजराने संपूर्ण ठक्कर डोम परिसर भक्तिमय वातावरणात भारावून गेला होता.

Advertisement

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश

‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ हा तीन दिवसीय महोत्सव सर्व नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य खुला आहे. या कार्यक्रमासाठी कोणत्याही तिकिटाची किंवा पासची आवश्यकता नाही. त्यामुळे नाशिककर, भाविक, युवा वर्ग आणि सांस्कृतिक रसिकांनी या आध्यात्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.