नाशिक, (प्रतिनिधी) २८ ऑगस्ट - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपपरिसराचे नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समजते. मात्र ज्यांनी शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले त्यांचे नाव बदलण्यात येऊ नये. इतर विद्यापीठांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. फुले दांपत्याचे जे कार्यक्षेत्र होते. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यानंतर हे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यात कुठलाही बदल केला जाऊ नये अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार भास्करराव भगरे, आमदार गोकुळ गीते,कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, प्रभारी कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र. कुलगुरु पराग काळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य सागर वैद्य यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आजचा दिवस हा केवळ एका इमारतीच्या उद्घाटनाचा दिवस नाही तर आजचा दिवस नाशिकच्या शैक्षणिक विकासाच्या एका नव्या पर्वाचा शुभारंभ आहे. सुमारे दीड-दोन वर्षे रखडलेल्या इमारतीला आज प्रत्यक्ष आकार मिळाला आहे. एका संकल्पनेपासून प्रत्यक्ष साकारलेल्या या वास्तूपर्यंतचा प्रवास अनेकांच्या प्रयत्नांचा, सातत्याचा आणि शिक्षणाबद्दलच्या बांधिलकीचा परिणाम आहे. नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्वतंत्र आणि सक्षम कॅम्पस असावे, यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिकची वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता उच्च शिक्षणाच्या सुविधा नाशिकमध्येच अधिक सक्षम होणे आवश्यक होते. त्यासाठी साधारण २०१२-१३ च्या काळात यासाठी मी मुंबईत बैठका घेतल्या. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानंतर २०१४ मध्ये शिवनई येथे जागा निश्चित झाली. विविध प्रशासकीय प्रक्रिया, जमीन हस्तांतरण आणि इतर अडचणींमुळे या प्रकल्पाला काही काळ लागला. सन २०२२ मध्ये या कामाला पुन्हा गती देण्याचे काम झाले आणि १७ जून २०२२ रोजी याच ठिकाणी या महत्त्वाकांक्षी कॅम्पसचे भूमिपूजन करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे सांगत शिक्षणाच्या या पवित्र कार्यासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आभार त्यांनी मानले.