गणेशोत्सवात प्रसादाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) २८ ऑगस्ट - "महाराष्ट्राचा राज्योत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांना शुद्ध आणि भेसळमुक्त प्रसाद मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नियमांची माहिती घेऊन तिचे काटेकोरपणे पालन करावे," असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

Advertisement

परवानग्या जलद गतीने द्या; रस्ते खड्डेमुक्त ठेवा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी दिलेला सामाजिक प्रबोधनाचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने शिस्त आणि पावित्र्य जपले गेले पाहिजे. जुन्या गणेश मंडळांच्या परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात. तसेच, मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रांतील आगमन व विसर्जनाचे मार्ग खड्डेमुक्त ठेवून तेथे रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

नियम मोडल्यास कठोर कारवाई; विश्वस्तांच्या कार्यालयांना करमाफी
फटाके आणि लाऊडस्पीकरच्या वापरात नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. बृहन्मुंबई महापालिका अधिनियमातील कलम १४३ नुसार ट्रस्टच्या नावावर कार्यालय असलेल्या मंडळांना मालमत्ता करात माफी देण्याची तरतूद असून महापालिका आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार योग्य ती प्रक्रिया राबवून प्रदूषण रोखले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावरील अफवांबाबत सतर्क राहा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बैठकीस उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. "मुंबईतील सुमारे १,८५० किमी लांबीचे रस्ते काँक्रीटचे झाले असून विसर्जन मार्गांवर खड्डे राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. तसेच मंडळांना ५ वर्षांची एकत्रित परवानगी देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे," असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवर मंडळांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

बैठकीला प्रमुख उपस्थिती

या बैठकीस कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), गृह राज्यमंत्री योगेश कदम, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई मनपा आयुक्त, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि मुंबई-पुण्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.