दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २८ ऑगस्ट - महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या 'पर्यटन धोरण २०२४' अंतर्गत राज्याला जागतिक स्तरावर 'माईस' (MICE - Meetings, Incentives, Conferences, Exhibitions) टुरिझमचे हब बनवण्यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र कन्व्हेंशन ब्युरो'ने मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच नाशिकची प्रमुख केंद्र म्हणून निवड केली आहे. या निर्णयामुळे नाशिकमध्ये राष्ट्रीय व जागतिक दर्जाच्या कॉर्पोरेट परिषदा, भव्य प्रदर्शने आणि डेस्टिनेशन वेडिंग्सना मोठी चालना मिळणार आहे.
नाशिकसाठी 'माईस' टुरिझम का महत्त्वाचे?
सिंगल विंडो क्लिअरन्स: 'महाराष्ट्र कन्व्हेंशन ब्युरो'च्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इव्हेंट आयोजकांना परवानग्या आणि परवाने मिळवण्यासाठी 'एकच खिडकी योजना' उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे नाशिकमध्ये मोठमोठे व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करणे सोपे होईल.
हॉटेल व वाईन्स उद्योगाला बूस्ट: 'वाईन कॅपिटल' अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये उत्तम हवामान, जागतिक दर्जाचे रिसॉर्ट्स, वाईनयार्ड्स आणि उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि 'इन्सेंटिव्ह ट्रिप्स'साठी नाशिक आयोजकांची पहिली पसंती ठरणार आहे.
आर्थिक भरभराट आणि रोजगार निर्मिती: एका मोठ्या आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय परिषदेमुळे स्थानिक हॉटेल्स, वाहतूक, केटरिंग, लॉजिस्टिक आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात शेकडो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतात. व्यावसायिक पर्यटकांचा मुक्काम आणि खर्च सर्वसामान्य पर्यटकांपेक्षा जास्त असतो, ज्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होईल.
महाराष्ट्राला जागतिक पातळीवर व्यावसायिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनवताना नाशिकचे निसर्गसौंदर्य, वाढती हॉस्पिटॅलिटी पायाभूत सुविधा आणि समृद्धी महामार्गामुळे वाढलेली कनेक्टिव्हिटी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.