नाशिक मनपाचा अजब कारभार... "ते खड्डे आम्ही बुजवणार नाही"... शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी केले हात वर....

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २८ ऑगस्ट - नाशिक शहरातील रस्त्यांची दैना आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, नाशिक महानगरपालिकेचे 'गायब' झालेले शहर अभियंता संजय अग्रवाल आज अचानक ॲक्शन मोडमध्ये दिसून आले. नाशिक-म्हसरूळ रस्त्यावर पडलेले खड्डे 'ओरिजिनल डांबरा'चा वापर करून बुजवताना ते स्वतः उपस्थित होते. शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असताना म्हसरूळ रोडवर अचानक दिसलेले हे डांबर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

"आम्ही आमचेच खड्डे बुजवणार!" – शहर अभियंत्यांचे अजब स्पष्टीकरण

कामकाजादरम्यान विद्यार्थी नेते अजिंक्य गीते यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्याशी शहरातील उर्वरित रस्त्यांबाबत चर्चा केली असता, मनपाच्या अंतर्गत विभागांमधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. "बांधकाम विभाग केवळ स्वतःच्या अखत्यारीत असलेलेच खड्डे बुजवेल," असे सांगत अग्रवाल यांनी पाणीपुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभागाने खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी घेण्यास थेट नकार दिला.

"आम्ही केलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठीच आमच्याकडे एजन्सी आणि निधी उपलब्ध आहे. पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी आमच्याकडे कोणताही निधी नाही. संबंधित विभागांनीच त्यांच्या कंत्राटातील अटींनुसार आपापले रस्ते दुरुस्त करावेत," अशी ठाम भूमिका संजय अग्रवाल यांनी मांडली.

Advertisement

प्रशासकीय ताळमेळाच्या अभावामुळे नागरिक वेठीस

एकाच महानगरपालिकेचे विविध विभाग एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलत असल्याने शहरातील सामान्य नागरिक मात्र खड्ड्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. रस्ता दुरुस्तीच्या कामात समन्वय नसल्याने 'बांधकाम विभाग' आणि 'इतर विभाग' यांच्यातील या तुसड्या कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

खडी-मुरुमाऐवजी डांबरानेच रस्ते बुजवा: अजिंक्य गीते

या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी नेते अजिंक्य गीते यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "म्हसरूळ रोडप्रमाणेच शहरातील उर्वरित सर्व रस्ते खडी, मुरुम किंवा माती टाकून तात्पुरते न बुजवता दर्जेदार डांबरानेच बुजवले जावेत, हीच नाशिककरांची अपेक्षा आहे. प्रशासन योग्य रीतीने काम करत आहे की नाही, हे पाहण्यासाठी नागरिकांनी आणि तरुणांनी आता अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज आहे," असे आवाहन अजिंक्य गीते यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.