स्वाध्याय परिवाराचा नाशिकमध्ये आज ऐतिहासिक रक्षाबंधन उत्सव... धनश्रीदीदी यांच्या उपस्थितीत असा रंगणार ‘दैवी भ्रातृभावाचा’ सोहळा...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २८ ऑगस्ट - स्वाध्याय परिवाराच्या वतीने या वर्षीचा रक्षाबंधन उत्सव अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या वातावरणात साजरा केला जात आहे. दिंडोरी तालुक्यातील चारोसे (ता. वणी खुर्द) येथील पटांगणावर शुक्रवारी, २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता हा अभूतपूर्व रक्षाबंधन सोहळा पार पडणार आहे. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख पूजनीय धनश्रीदीदी तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून हजारो स्वाध्यायी व आदिवासी बंधू-भगिनी एकत्र येणार आहेत.

१६५० वनवासी पाड्यांवर नि:स्वार्थ 'भक्तीफेरी'
गेल्या दोन वर्षांपासून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव या भागांतील जवळपास ११,५०० स्वाध्यायी बंधू-भगिनी आसपासच्या १,६५० आदिवासी गाव-पाड्यांमध्ये सातत्याने जात आहेत. कोणत्याही स्वार्थाविना, केवळ 'हृदयस्थ भगवंताच्या' विचारातून आणि 'दैवी भ्रातृभावाच्या' भावनेतून त्यांनी आदिवासींशी एक निर्मळ व आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. या भक्तिफेरीच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या हजारो वनवासी बंधू-भगिनींचा सन्मान आणि त्यांच्यासोबतचा स्नेहभाव वृद्धिंगत करणे, हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement

उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये:
धनश्रीदीदींचे मंगल प्रवचन: स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या सुपुत्री आणि परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांचे मार्गदर्शन व प्रवचन या सोहळ्याचा केंद्रबिंदू असणार आहे.
विशेष नृत्यगीताद्वारे मानवंदना: दीदींच्या आगमनाप्रसंगी हजारो स्वाध्यायी युवक-युवती एका विशेष सांस्कृतिक नृत्यगीताद्वारे त्यांना मानवंदना देतील.

आदिवासी बांधवांचा उस्फूर्त सहभाग: उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतून हजारो वनवासी बांधव या सोहळ्यात हजेरी लावणार असून, आदिवासी संस्कृती आणि स्वाध्याय विचारांचा अनोखा संगम येथे पाहायला मिळेल.

नात्यांचे उदात्तीकरण आणि संस्कृतीचे रक्षण
आजकाल रक्षाबंधन या पवित्र सणात काहीशी यांत्रिकता व रूक्षता आली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाध्याय परिवाराच्या वतीने या सणाला केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण समाजाला 'दैवी भ्रातृभावाच्या' धाग्यात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूज्य दादांनी दिलेली संस्कृती रक्षणाची प्रेरणा आणि नात्यांचे ऊर्ध्वीकरण करण्याची ही परंपरा चारोसे येथील या सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.

नाशिक जिल्ह्याला या सोहळ्याचे आयोजक पद मिळाल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि स्वाध्याय परिवारात उत्साहाचे वातावरण असून, कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.