पोलीस ठाण्यात ठिय्या ते पालकमंत्र्यांना राखी... नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर मोठे यश...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २८ ऑगस्ट - नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड), हायवे क्र. २९ (चिंचखेड ते जोपुळ, दिंडोरी) तसेच पाथर्डी कचरा डेपो बाधित शेतकऱ्यांच्या वतीने करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला गुरुवारी (२७ ऑगस्ट) मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी भेट देऊन सुमारे ५०० ते ६०० शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक होईपर्यंत रिंगरोडशी संबंधित सर्व प्रशासकीय कामे स्थगित करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मोर्चा अडवल्यानंतर पोलीस ठाण्यातच ठिय्या

आपले घरदार, शेती आणि संसार वाचवण्याच्या मागणीसाठी २५ ऑगस्ट रोजी बाधित शेतकरी रक्षाबंधनाचे औचित्य साधून मुंबईच्या दिशेने पायी निघाले होते. मात्र, पोलिसांनी मोर्चा अडवून करण गायकर यांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. त्यानंतर संतप्त बाधित शेतकऱ्यांनी सहकुटुंब पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. शासनस्तरावरून ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.

प्रशासकीय गैरसमज आणि शेतकऱ्यांच्या मागण्या

आंदोलनकर्त्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्यातील तफावत, ग्रामीण भागासाठी ‘गुणांक २’ लागू करणे, फळझाडांचे कमी दिलेले दर, एकाच गावात वेगवेगळे दर आणि अलाइनमेंटमधील त्रुटी यांबाबतचे पुरावे पालकमंत्र्यांसमोर मांडले. यावर बोलताना पालकमंत्री महाजन म्हणाले, "यापूर्वी झालेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना सर्व प्रश्न सुटल्याचे चुकीचे ब्रीफिंग देण्यात आले होते. त्यामुळे गैरसमज निर्माण झाला. मात्र, शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही."

कामकाज तत्काळ स्थगितीचे निर्देश

शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत पालकमंत्री महाजन यांनी आंदोलनस्थळावरूनच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन अंतिम तोडगा निघेपर्यंत मोजणी, भूसंपादन, नोटिसा बजावणे अथवा जमीन खरेदी यांसारखी कोणतीही कारवाई करू नये आणि शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, असे सक्त निर्देश त्यांनी दिले.

२ ते ३ दिवसांत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

Advertisement

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगत महाजन यांनी स्पष्ट केले की, २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने बैठकीसाठी वेळ शक्य नाही. मात्र, पुढील २ ते ३ दिवसांत मंत्रालयात १ तासाची विशेष बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीला बाधित शेतकरी प्रतिनिधी, MSIDCचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री स्वतः उपस्थित राहून सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढतील.

शेतकरी महिलांनी पालकमंत्र्यांना बांधल्या राख्या

मुख्यमंत्र्यांना राखी बांधता न आल्याने भावूक झालेल्या शेतकरी महिलांनी आंदोलनस्थळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच राख्या बांधून आपल्या शेती व संसाराचे रक्षण करण्याचे साकडे घातले. प्रतिनिधी स्वरूपात ४ ते ५ शेतकरी महिलांना मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्याचे आश्वासनही महाजन यांनी दिले.

"अधिकाऱ्यांच्या तालावर न नाचता शेतकरीहिताचा निर्णय घ्यावा"

"मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर बैठक, प्रश्नांवर ठोस तोडगा आणि शेतकऱ्यांना न्याय हाच आता पुढील मार्ग आहे. नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करत हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत, ते त्यांनी थांबवावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढील बैठकीत योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा. अधिकाऱ्यांच्या नादी न लागता शेतकरीहिताचा निर्णय घेणे हेच विकासाच्या दृष्टीने योग्य ठरेल."

— करण गायकर (संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना)

या यशस्वी आंदोलनानंतर शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी मंत्रालयातील बैठकीत ठोस निर्णय होण्याची प्रतीक्षा सर्वांना आहे. किसान सभेचे सरचिटणीस राजू देसले यांनी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासन, पत्रकार, मनसे व विविध संघटनांचे आभार मानले. या प्रसंगी शेतकरी नेते नाना बच्छाव, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, शुभम देशमुख यांसह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.