७०-८० जणांच्या टोळक्याची म्हसरूळमध्ये दहशत... महिलांना शिवीगाळ करत 'हात-पाय तोडण्याची' धमकी...

Share:
Main Image
Last updated: 27-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - जमिनीच्या जुन्या वादातून ७० ते ८० जणांच्या टोळक्याने आदिवासी कुटुंबाला धक्काबुक्की करत, जातीवाचक शिवीगाळ आणि हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना दिंडोरी जकात नाका भागात घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात प्रवीणचंद्र शहा यांच्यासह अन्य संशयितांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणचंद्र वालचंद शहा, तेजस प्रवीणचंद्र शहा, सुरेखाबेन महेंद्र शहा आणि मनोजकुमार गवई यांच्यासह इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने यासंदर्भात म्हसरूळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

१९९३ पासूनचा वाद: तक्रारदार आदिवासी कुटुंबाचा ताबा असलेल्या जमिनीवरून १९९३ पासून वाद सुरू असून, हे प्रकरण अप्पर तहसील कार्यालयात न्यायप्रविष्ट आहे.

Advertisement

७०-८० जणांचा जमाव: गुरुवारी (दि. २०) दुपारी संशयितांनी ७० ते ८० जणांचा जमाव सोबत आणून परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. संशयित एमएच ४१ एवाय ८६८७ या क्रमांकाच्या गाडीसह अन्य वाहनांतून आले होते.

धक्काबुक्की व शिवीगाळ: महापालिकेने अतिक्रमण मोहिमेत शेड काढल्याचा संदर्भ देत या टोळक्याने वाद घातला. तक्रारदार महिलेच्या सुनेला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली.

हात-पाय तोडण्याची धमकी: "आम्ही प्रवीणचंद्र शहा यांची माणसे आहोत, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही," असा दम भरत पुन्हा या जागेवर आल्यास "हात-पाय तोडून टाकू," अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

महापालिका केवळ अतिक्रमण काढू शकते, परंतु जागेचा ताबा दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवू शकत नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. म्हसरूळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.